आशिया करंडकासाठी पात्र ठरलो, तर विक्रमाला अर्थ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई - इंग्लंडचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघाने सलग आठ आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली. मात्र, यानंतरही संघ प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टटाईन समाधानी नाहीत. ‘आशिया करंडक स्पर्धेसाठी पात्र ठरलो, तरच या विक्रमाला अर्थ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

मुंबई - इंग्लंडचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघाने सलग आठ आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली. मात्र, यानंतरही संघ प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टटाईन समाधानी नाहीत. ‘आशिया करंडक स्पर्धेसाठी पात्र ठरलो, तरच या विक्रमाला अर्थ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

भारतीय संघ चांगली कामगिरी करतोय, पण त्यांच्या याच कामगिरीत सातत्याची आणि आशिया करंडक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची आवश्‍यकता आहे, असे सांगून कॉन्स्टटाईन म्हणाले, ‘‘आशियाई करंडकासाठी पात्र ठरणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यात जर यशस्वी ठरलो, तर आमच्या या विक्रमांना आणि ‘फिफा’ क्रमवारीला अर्थ रहात नाही. अर्थात, आम्ही जिंकतोय यालादेखील महत्त्व आहे. आशियाई करंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत मकावविरुद्धच्या लढतीपूर्वी लय गवसणे आवश्‍यक आहे. म्हणून या आंतरराष्ट्रीय तिरंगी स्पर्धेला महत्त्व आहे.’’

भारतीय संघाच्या विजयी मालिकेत कॉन्स्टटाईन यांनी सर्वांचा वाटा समान असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, ‘‘ही कामगिरी केवळ माझी किंवा माझ्या खेळाडूंची नाही. त्यांच्याबरोबर असणाऱ्या प्रत्येकाला हा मान मिळायला हवा. डॉक्‍टर, फिजिओ, प्रसिद्धी विभागप्रमुख, साहित्य व्यवस्थापक, मसाजर प्रत्येकाचे संघासाठी योगदान आहे.’’

मॉरिशसविरुद्धच्या सामन्याविषयी बोलताना कॉन्स्टटाईन म्हणाले, ‘‘पहिल्या सत्रात आम्ही खूप खराब खेळ केला. त्यांना पहिला गोल करण्याची संधी दिली, ही खरी आमची चूक झाली. प्रतिस्पर्धी दुबळा असल्यामुळे निभावले. मॉरिशसला आम्ही नको तेवढा आदर दाखवला. बरोबरी करण्याची संधी मिळाली हे आमचे नशीब; पण उत्तरार्धात आम्ही काही बदल केले आणि आम्ही खेळावर वर्चस्व राखले.’’

भारताचा दुसरा सामना गुरुवारी (ता. २४) सेंट किट्‌स आणि नेव्हिसविरुद्ध होणार आहे. या सामन्यात आम्ही काही बदल करू, याचे संकेतही कॉन्स्टटाईन यांनी दिले.

संदेश झिंगान चांगला झुंजार खेळाडू आहे. तो सहकाऱ्यांना प्रेरणा देणारा खेळ करतो. सुनील छेत्री निवृत्त होईल, त्या वेळी त्याची जागा घ्यायला संदेश नक्कीच तयार असेल.
- स्टीफन कॉन्स्टंटाईन, भारतीय मार्गदर्शक