निमंत्रित हॉकी: भारताने अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

व्हॅलेन्सिया (स्पेन) - भारतीय हॉकी संघाने सहा देशांच्या निमंत्रित स्पर्धेत शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाला 3-3 असे बरोबरीत रोखले.

व्हॅलेन्सिया (स्पेन) - भारतीय हॉकी संघाने सहा देशांच्या निमंत्रित स्पर्धेत शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाला 3-3 असे बरोबरीत रोखले.

संथ झालेल्या पूर्वार्धात अर्जेंटिनाने सामन्यावर वर्चस्व राखले. पण, त्यांना त्यानंतरही गोल करण्यासाठी अखेरच्या टप्प्याची वाट पाहावी लागली. मध्यंतराला काही क्षण असतानाच मतिआस पॅरेडेस याने अर्जेटिनाला आघाडीवर नेले. उत्तरार्धात मात्र, भारतीय संघाने अर्जेंटिनाच्या गोलकक्षात अनेक आक्रमणे केली. गोल करण्याची सुवर्णसंधी रमणदीपने व्यर्थ दवडली. सुरेख चाल रचून मुंसडी मारणाऱ्या रमणदीपला त्या वेळी केवळ अर्जेंटिनाच्या गोलरक्षकास चकवायचे होते. पण, त्याचा फटका बाहेर गेला. त्यानंतर मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर रूपिंदरने भारताला बरोबरी साधून दिली.

एकेक गोलच्या बरोबरीनंतर मात्र उत्तरार्धातील खेळ कमालीचा वेगवान झाला. त्यात अर्जेंटिनाने पुन्हा एकदा सरस ठरले. लागोपाठ दोन गोल करून त्यांनी आघाडी घेतली. प्रथम गोन्झालो पेईलॅटने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर लुकास व्हिला याने मैदानी गोल केला. सामन्याच्या अखेरच्या सत्रात भारताचा खेळ बहरला होता. त्यांनी अर्जेंटिनाकडे चेंडूचा ताबा अधिक राहणार नाही, याची काळजी घेतली. पण, त्यांचा बचाव ते भेदू शकले नाहीत. तिसऱ्या सत्राच्या अखेरीस भारताला सामन्यातील पहिला कॉर्नर मिळाली. पण, रपिंदरचे प्रयत्न अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाने फोल ठरवले.

अखेरच्या सत्रात उजव्या बाजूने चाल रचत भारतीयांनी मुसंडी मारली होती. दानिश मुजताबाने गोल कक्षात संधी साधून रमणदीपकडे पास दिला आणि त्याने भारताचा दुसरा गोल केला. या गोलनंतर भारतीयांच्या आक्रमणांना धार आली. अर्जेंटिना दडपणाखाली गेले आणि 57व्या मिनिटाला देविंदरने सुरेख मैदानी गोल करत भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर अर्जेटिनाला अखेरच्या क्षणी मिळालेला कॉर्नर भारतीय गोलरक्षक श्रीजेश याने अडवला आणि सामना बरोबरीत राहिला.