कुमार हॉकी स्पर्धेत भारतीय संघ विजेता

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

नवोदित खेळाडूंनाच या विजयाचे श्रेय द्यायला हवे. त्यांनी महत्त्वाच्या सामन्यात खेळ उंचावला. त्याचबरोबर आखलेल्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली. बांगलादेशच्या सुरवातीच्या पराभवानंतर खेळाडूंना आपल्या चुकांची जाणीव झाली. त्यावर मात करण्यास आम्ही मदत केली.
- बीजे करिअप्पा, भारतीय मार्गदर्शक.

मुंबई : तीन सेकंद असताना अभिषेकने गोल केला आणि त्या गोलच्या जोरावर भारताने आशियाई कुमार हॉकी स्पर्धेच्या अंतिम लढतीत बांगलादेशला 5-4 असे हरवून विजेतेपदाचा करंडक उंचावला. भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला हरवले होते.

ढाक्‍यात झालेल्या या स्पर्धेत भारताला सलामीच्या लढतीत बांगलादेशविरुद्ध हार पत्करावी लागली होती; पण त्याचा वचपा भारतीय कुमारांनी अंतिम लढतीत काढला. पूर्वार्धातील 1-2 पिछाडीनंतर भारतीयांनी उत्तरार्धात चांगलाच वेगवान खेळ केला; मात्र बांगलादेश हार मानत नव्हते. भारताने काही मिनिटांत दोन गोल केले खरे; पण

भारताची 3-2 आघाडी तेरा मिनिटेच टिकली. बांगलादेशने बरोबरी साधली खरी; पण त्याचे समाधान त्यांना काही सेकंदच लाभले. मात्र बांगलादेशने 60 व्या मिनिटास बरोबरी साधली.

सामन्यातील बरोबरीची कोंडी कायम राहणार असे वाटत असतानाच अभिषेकने तीन सेकंद बाकी असताना गोल करीत भारताचा विजय साकारला. त्याचबरोबर सातत्याने आपल्या संघास प्रोत्साहित करणाऱ्या बांगलादेश पाठीराख्यांना शांत केले.

भारताच्या आक्रमणास बांगलादेशने सातत्याने जोरदार प्रतिआक्रमणानेच उत्तर दिले. शिवम आनंद, हार्दिक सिंग, दिलप्रीत सिंग, इबुंगो सिंग यांनीही भारताकडून गोल केले; तर बांगलादेशकडून एम. रोमन सरकार, महम्मद मोहसीन, महम्मद अश्रफुल, महबूब हुसेन यांनी गोल केले. हार्दिकची अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली; तर पंकज कुमार राजक याला सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवडण्यात आले.