भारतास अखेर आशिया विजेतेपद 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

आकाश चिकटे सर्वोत्तम गोलरक्षक 
मूळचा अमरावतीचा; पण आता पुण्याच्या बीईजीकडून खेळत असलेल्या आकाश चिकटे याची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर भारताच्या हरमनप्रीतला सर्वोत्तम गोलसाठी बक्षीस देण्यात आले, तर या स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करण्याच्या क्रमवारीत हरमनप्रीत (7) संयुक्त अव्वल आला. 

मुंबई : भारतीय हॉकी संघाने चाहत्यांवरील दडपण अखेरच्या मिनिटांपर्यंत कायम ठेवले, पण या दडपणास सामोरे गेलेल्या भारतीय हॉकीप्रेमींना भारतीय संघाने आशियाई हॉकी विजेतेपदाची भेट दिली. भारताने या विजेतेपदाचा दहा वर्षांचा दुष्काळ संपवताना मलेशियाचे निर्माण केलेले कडवे आव्हान 2-1 असे परतवले. 

ढाक्‍यातील या स्पर्धेतील अंतिम लढतीत भारताने तिसऱ्या मिनिटास खाते उघडले. दुसरे सत्र संपेपर्यंत 2-0 आघाडी घेतली होती. तिसऱ्या सत्रात खेळाची सूत्रे पूर्ण आपल्याकडे ठेवली; पण याच वेळी गोलच्या संधी दवडण्याची स्पर्धाच भारतीय खेळाडूंमध्ये झाली. हे कमीच की काय चौथ्या तसेच अखेरच्या सत्रात भारतीय बचावफळीने चूका करीत मलेशियास प्रतिआक्रमणाची संधी दिली. त्यामुळे भारतीय बचावफळीवरील दडपण वाढले. त्याचा फायदा घेत दहा मिनिटे असताना मलेशियाने भारताची आघाडी कमी केली. अखेरच्या सत्रात मलेशिया आक्रमण आपल्या विस्कळित बचावाचा फायदा घेणार नाहीत, याची काळजी भारतीयांनी घेतली आणि 2007 नंतर प्रथमच आशिया कप जिंकला. 

भारताचा पहिला गोल दृष्ट लागण्याजोगाच होता. मलेशिया गोलरक्षकाची सर्वोत्तम गोलरक्षकात गणना होते. त्याला त्याची जागा सोडण्यास भारतीय आक्रमकांनी भाग पाडले. रमणदीपसिंगने सुनीलच्या अचूक पासचे गोलात रूपांतर केले. भारतीय मैदानी गोलसाठी जास्त प्रयत्नशील होते; पण त्यातही पूर्वार्धात दोन पेनल्टी कॉर्नर दवडले गेले. मात्र याची सांगता सुमीतने रचलेली चाल ललित उपाध्यायने सत्कारणी लावत भारताची आघाडी वाढवली. 

भारताची खेळण्याची 4-3-3 पद्धत सुरवातीपासून प्रभावी ठरणार असेच दिसत होते. मात्र मलेशियाने विश्रांतीनंतर बचाव भक्कम केला. त्यातच भारतीय आक्रमकांकडून गोलच्या संधी दवडल्या जात होत्या. आघाडी वाढत नसल्यामुळे दडपण वाढत होते, चूका होण्यास सुरवात झाली. त्यातच अखेरच्या सत्रातील मलेशियाच्या आक्रमणामुळे भारतीय बचाव कोलमडण्यास सुरुवात झाली. या स्पर्धेत यापूर्वी एकही लढत न गमावलेला भारत अंतिम फेरीत हार पत्करणार का अशी भीती वाटू लागली, पण अखेर भारताने मलेशियाचे पहिल्या आशियाई विजेतेपदाचे स्वप्न तडीस जाऊ दिले नाही. 

आकाश चिकटे सर्वोत्तम गोलरक्षक 
मूळचा अमरावतीचा; पण आता पुण्याच्या बीईजीकडून खेळत असलेल्या आकाश चिकटे याची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर भारताच्या हरमनप्रीतला सर्वोत्तम गोलसाठी बक्षीस देण्यात आले, तर या स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करण्याच्या क्रमवारीत हरमनप्रीत (7) संयुक्त अव्वल आला. 

पाकिस्तानला ब्रॉंझ 
पाकिस्तानने कोरियास 6-3 असे पराजित करून ब्रॉंझपदक जिंकले. एजाझ अहमदची हॅटट्रिक हे पाक विजयाचे वैशिष्ट्य. कोरियाचा बचाव खूपच खराब होता. त्याचा पुरेपूर फायदा पाकने घेतला. यापूर्वीच्या सामन्यात आम्ही अनेक संधी दवडल्या होत्या, पण या वेळी साधल्या, त्याचा फायदा झाला, असे पाक कर्णधार महंमद इरफानने सांगितले. 

आशियाई हॉकी आणि भारत 
- भारताची आता आशिया हॉकीत निर्विवाद हुकमत 
- भारत यापूर्वीच आशियाई क्रीडा स्पर्धा विजेता (2014) तसेच आशिया चॅम्पियन्स करंडक विजेता (2016) 
- भारत यापूर्वी दोनदा विजेता, 2003 मध्ये क्वालालंपूरला, तर 2007 च्या स्पर्धेत चेन्नईत 
- भारताने स्पर्धा इतिहासात तिसऱ्यांदा अंतिम फेरीची लढत जिंकली 
- भारताची ही आठवी अंतिम फेरीची लढत 
- मलेशिया प्रथमच अंतिम फेरी खेळत होते 
- बत्तीस वर्षांपूर्वी ढाक्‍यातील आशिया कप हॉकी स्पर्धेतील अंतिम लढतीत पाकने भारतास हरवले होते, आता पाकला हरवूनच भारत अंतिम फेरीत