पाकिस्तानविरुद्ध विजयाचे लक्ष्मीपूजन!!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

कुआनतान (मलेशिया) - भारतीयांनी अपेक्षेनुसार आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील साखळीतील विजयाची पुनरावृत्ती करताना भारताने पाकिस्तानचे आव्हान मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत परतवले आणि आशियाई हॉकीत चॅम्पियन्स होत जणू लक्ष्मीपूजनच केले. त्याचबरोबर या वर्षातील आपल्या मोहीमेची सांगता अखेर विजेतेपदाने केली. 

कुआनतान (मलेशिया) - भारतीयांनी अपेक्षेनुसार आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील साखळीतील विजयाची पुनरावृत्ती करताना भारताने पाकिस्तानचे आव्हान मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत परतवले आणि आशियाई हॉकीत चॅम्पियन्स होत जणू लक्ष्मीपूजनच केले. त्याचबरोबर या वर्षातील आपल्या मोहीमेची सांगता अखेर विजेतेपदाने केली. 

मलेशियात झालेल्या या स्पर्धेत भारताने एकदाही आघाडी गमावली नाही, पण भारताचा खेळ अंतिम फेरीतील विजेत्यास साजेसाही नव्हता. वर्चस्व असताना ते भक्कम करण्याची संधी भारतीयांनी दवडली होती. मोक्‍याच्या तिसऱ्या सत्रात पाकला प्रतिआक्रमणाची संधी दिल्यावर चौथ्या सत्रात खेळ कमालीचा ऊंचावत भारतीयांनी या विजेतेपदावरील आपला हक्क प्रस्थापीत केला. या स्पर्धेत भारताने एकही लढत गमावली नाही. कोरियाविरुद्धची साखळीतील बरोबरी सोडल्यास भारताने या स्पर्धेत एकतर्फी हुकुमत राखली. 

पाच वर्षापूर्वी म्हणजेच 2011 मध्ये अंनंत चतुदर्शीच्या दिवशी भारताने पाकिस्तान पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून पहिल्याच आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत बाजी मारली होती. त्यानंतरच्या दोन्ही स्पर्धा पाकने जिंकल्या होत्या, पण देशात पाकविरुद्ध वातावरण असताना हॉकी संघाने भारतीयांना निराश केले नाही. आम्ही हरलो, तर सीमेवरील जवानांना दुःख होईल, याच भावनेने भारतीय संघ पाकविरुद्ध खेळला. बचावातील काही चूका सोडल्या, तर भारताचे वर्चस्व सहज जाणवणारे होते. भारतीयांनी सुरवातीपासून आक्रमक खेळ करीत पाकवर दडपण आणले. त्या दडपणाखाली पाकला चूका करण्यास भाग पाडले. 

रुपिंदर पाल सिंगने 18 व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताचे खाते उघडले. युसुफ अफान या नवोदित आक्रमकाने भारतीय काय करु शकतात, याची प्रचिती दिली. सरदार सिंगचा अचूक टॅपवर त्यावेळी युसुफने चेंडूला जाळीची दिशा दिली होती. तिसऱ्या सत्रात पाक बहरले. महंमद अलीम बिलाल आणि अली शान यांनी गोल करीत भारतास दडपणाखाली आणले. तिसरे सत्र संपण्याच्या सुमारास भारतीय कोलमडणार असेच वाटत होते, पण चौथ्या सत्रात जोरदार सुरुवात करीत भारतीयांनी पाकला हादरा दिला. निक्कीन थिमय्या याने 50 व्या मिनिटास गोल करीत भारतीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

या वर्षांत भारत तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला होता. या आधी सुल्तान अझलन शाह आणि चॅंपियन्स कंरडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 

अंतिम सामन्यात कामगिरी अपेक्षेइतकी चांगली झाली नाही, पण पाकिस्तानला हरवून ही स्पर्धा जिंकली हे नक्कीच जास्त सुखावणारे आहे. ही आमची भारतीयांना दिवाळीची भेट आहे. 
- सरदारा सिंग तसेच एस के उथप्पा, भारतीय हॉकीपटू 

आम्ही हरलो असलो तरी या सामन्यातून खूप काही कमावले आहे. भारताला चांगली झुंज दिली, पण संधीचा फायदा घेऊ शकलो नाही. आज प्रतिस्पर्धी संघात सर्वोत्तम हॉकी लढत झाली. 
- ख्वाजा जनैद, पाकिस्तान मार्गदर्शक 

दृष्टीक्षेपात 
- चीनमधील पहिली स्पर्धा भारताने जिंकली होती 
- पाकिस्तान यापूर्वीच्या दोन स्पर्धेत विजेते 
- तीन वर्षापूर्वीच्या तिसऱ्या स्पर्धेत भारत पाचवा होता. 
- आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेतील सातवी लढत 
- यापूर्वीच्या सहा लढतीत प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येकी दोन विजय, तर दोन लढती बरोबरीत, यापैकी एका लढतीत पेनल्टीजवर भारताचा विजय 
- दोघातील ही तिसरी अंतिम लढत 2011 च्या स्पर्धेत भारताची सरशी, तर 2012 च्या स्पर्धेत पाकची 
- प्रतिस्पर्ध्यातील ही एकंदर 167 वी लढत, यापूर्वीच्या 166 लढतीत भराताचे 54 विजय, तर पाकचे 82. उर्वरीत 30 लढती बरोबरीत 
- या स्पर्धेत भारताचे 27 गोल, तर पाकचे 14