भारताची ऐनवेळी नांगी; मलेशियाविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत पराभव

Hockey India
Hockey India

मुंबई : पाच पेनल्टी कॉर्नर, आक्रमणात योजनांचा अभाव यामुळे भारतास सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत यजमान मलेशियाविरुद्ध हार पत्करावी लागली आणि या पराभवामुळे भारताच्या विजेतेपदाची लढत खेळण्याच्या आशा साखळीतच संपुष्टात आल्या. भारतास आता ब्रॉंझपदकासाठी लढावे लागेल. 

अव्वल संघांविरुद्ध सरस खेळ करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा खेळ दुबळ्या संघाविरुद्ध खालावतो हेच पुन्हा दिसले. 

या स्पर्धेची अंतिम फेरी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल. त्यातील ब्रिटनविरुद्ध दोनदा आघाडी दवडल्यामुळे भारतास बरोबरी पत्करावी लागली होती, तर ऑस्ट्रेलियास कडवी लढत दिली होती. या दोघांनीही मलेशियास सहज हरवले होते, पण त्याच मलेशियाविरुद्ध खेळ करीत भारताने हार ओढवून घेतली. आता उद्या (ता. 6) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ब्रॉंझपदकासाठी लढत होईल. 

ब्रिटनने न्यूझीलंडला 3-2 असे हरवल्यामुळे भारतास अंतिम फेरीसाठी दोन गोलच्या फरकाने विजय आवश्‍यक होता. प्रत्यक्षात सिम शाहरील साबाह याला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची पन्नासाव्या मिनिटास संधी देत भारताने हार पत्करली. जपानने ऑस्ट्रेलियास धक्का दिला होता, त्यापासून जणू प्रेरणा घेत मलेशियाने जोरदार खेळ केला आणि त्यासमोर भारतीय कोलमडले. भारतीय हॉकी मार्गदर्शक रोएलॅंट ऑल्टमन्स यांना या पराभवाचे नक्कीच सखोल विश्‍लेषण करावे लागेल. वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीचा टप्पा काही आठवड्यांवर असताना भारताकडून किमान उपविजेतेपदाची आशा होती. 

भारतास दोन गोलच्या फरकाने विजय हवा होता, तरीही आक्रमणात सामंजस्य नव्हते. दोन आक्रमकांकडे सतत आक्रमणाचीच धुरा होती, पण या परिस्थितीत मध्यरक्षकांनी प्रतिस्पर्ध्यांना प्रतिआक्रमणापासून रोखणे आवश्‍यक असते, नेमके हेच घडत नव्हते. सुरवातीस मलेशियाने जोरदार प्रतिआक्रमणे केल्यावर भारतीयांवर दडपण आले. एस.व्ही. सुनीलसारखा अनुभवी आक्रमक चेंडूवर ताबा घेण्यासाठी प्रतीक्षा करण्यास तयार नव्हता. त्याला मार्क केले असले तरी चेंडूवर पूर्ण ताबाच न घेणे हे धक्कादायक होते. 

सामन्यातील अखेरच्या काही सेकंदांत गोलक्षेत्रात सुरेंदरने स्टीक वेगाने फिरवली, पण चेंडूला योग्य दिशा देऊच शकला नाही. भारतीयांकडून संपूर्ण सामन्यात प्रामुख्याने हेच घडत होते. दोन ड्रॅगफ्लिकर संघात होते; पण पाच पेनल्टी कॉर्नर वाया गेले. मलेशियाचा 37 वर्षीय गोलरक्षक कुमार सुब्रमण्यम याने भारतीय आक्रमकांविरुद्धच्या सुरवातीच्या चकमकी जिंकल्या, त्यानंतर त्याला चकवणे भारतीयांच्या आवाक्‍याबाहेरच आहे असेच वाटू लागले. 

यजमान असूनही मलेशिया स्पर्धेत तळास आहेत. जागतिक क्रमवारीत भारत सहावा तर मलेशिया चौदावे आहेत, पण याचे कोणतेही प्रतिबिंब या लढतीत दिसले नाही. त्याऐवजी स्पर्धेतील विजयाचे दावेदार समजले जात असलेल्या भारताने मलेशियास त्यांचा स्पर्धेतील पहिला विजय नोंदवण्याचीच संधी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com