हॉकीत आशियाई शालेय जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

भोपाळ - भारताने पाचव्या आशियाई शालेय हॉकी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. येथील ऐशबाग स्टेडियमवर भारताने अंतिम सामन्यात मलेशियावर 5-1 अशी मात केली. आलिशान महंमद याने 12व्या मिनिटाला मैदानी गोलवर भारताचे खाते उघडले. प्रताप लाक्राने तीन मिनिटांच्या अंतराने दोन गोल केले. 20व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर, तर 23व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर त्याने लक्ष्य साधले. 32व्या मिनिटाला अकिमुल्लाह अनुआर इसूक याने मलेशियाचे खाते उघडले. त्यानंतर दोन मिनिटांनी आलिशान याने वैयक्तिक दुसरा व संघाचा चौथा गोल केला. 38व्या मिनिटाला मनिंदरसिंग याने पाचवा गोल नोंदविला. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता. सिंगापूरने चीनला 3-1 असे हरवून तिसरे स्थान मिळविले. श्रीलंकेने थायलंडवर 4-1 अशी मात करीत पाचवा क्रमांक मिळविला.