सलग दुसऱ्या विजयासह भारत उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

वेस्ट व्हॅंकव्हूर - भारतीय महिला हॉकी संघास वर्ल्ड हॉकी लीगच्या दुसऱ्या फेरीच्या स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात विजयासाठी झगडावे लागले. सलग दोन विजयासह भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

वेस्ट व्हॅंकव्हूर - भारतीय महिला हॉकी संघास वर्ल्ड हॉकी लीगच्या दुसऱ्या फेरीच्या स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात विजयासाठी झगडावे लागले. सलग दोन विजयासह भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

भारताने दुबळ्या बेलारुसचे आव्हान 1-0 असे कसेबसे परतवले. जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा बेलारुसचे स्थान आठ क्रमांकांनी खाली आहे. तरीही बेलारुसच्या योजनाबद्ध प्रतिआक्रमणाचा सामना भारताला करावा लागला. भारताचा सलामीचा विजय साकारणारी गोलरक्षिका सविताच खरे, तर भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने दोन मिनिटे शिल्लक असताना बेलारुसचा पेनल्टी कॉर्नर झेपावत रोखला आणि भारतीय संघाने सुटकेचा निःश्‍वास सोडला. सविताने उरुग्वेविरुद्ध पेनल्टी शूटआऊटवर निर्णायक कामगिरी केली होती.

वंदना कटियारने 26 व्या मिनिटास बॅक हॅण्डेड मैदानी गोल केला आणि याच जोरावर भारताने बाजी मारली. भारतीय आक्रमणे जोरदार होती; पण त्यात फिनिशिंग टचचा अभाव होता. अखेरच्या दोन सत्रांत तीन पेनल्टी कॉर्नर वाया गेले. त्यातच गोलक्षेत्रात भारतीय आक्रमकांना बेलारुसची बचावफळी संधीच देत नव्हती. भारताचा बचाव बऱ्यापैकी भक्कम दिसत असला, तरी त्याला क्वचितच बसणारे हादरे नक्कीच चिंताजनक होते. अखेरच्या काही मिनिटांत भारतीय बचाव जवळपास कोलमडलाच होता; पण सविता मदतीस धावून आली.

Web Title: india women hockey team in semi final