हॉकी : भारताची आज बांगलादेशविरुद्ध लढत 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

ढाका (बांगलादेश) : जपानवरील दणदणीत विजयानंतर मनोधैर्य आणखी उंचावलेल्या भारतीय संघाची आशिया करंडक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध लढत होत आहे. 

'अ' गटात मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने जपानविरुद्ध सत्रागणिक खेळ उंचावला. जपानच्या प्रतिआक्रमणामुळे खेळाडू गडबडून गेले नाहीत. जपानचे प्रशिक्षक सिएगफ्रीड ऐकमन यांची प्रतिक्रिया बोलकी ठरली. 'आम्ही प्रतिआक्रमण चांगले रचले; पण अखेरीस भारतीय खेळाडूंच्या वेगासमोर आम्हाला काही करता आले नाही. भारतीय खेळाडू अत्यंत तंदुरुस्त होते,' असे ते सामन्यानंतर म्हणाले. 

भारताचे मुख्य प्रशिक्षक जोएर्ड मरीने यांनी सांगितले, ''भन्नाट फॉर्म कायम राखण्याचा भारताचा निर्धार असेल. आम्हाला प्रभावी सुरवातीचा फायदा उठवायचा आहे.'' जपानविरुद्ध त्यांनी अनुभवी सरदार सिंगला 'मुक्त बचावपटू' (फ्रीमन डिफेंडर) म्हणून खेळविले होते. त्याने बचाव फळीतून खेळाची सूत्रे चालविली. हर्मनप्रीत सिंगला मध्य फळीत घोडदौड करता यावी म्हणून त्याने पुरेशी मोकळीक दिली. हे डावपेच यशस्वी झाले. त्याने चेंडू लांबवर 'स्कूप' करीत आघाडी फळीतील ललित उपाध्याय याच्यासाठी संधी निर्माण केली. ललितने अप्रतिम फटका मारत संघाचा दुसरा गोल नोंदविला. मरिने यांच्यामते खेळातील मूलभूत गोष्टी अचूक करीत राहणे आणि नियोजित डावपेचांची मैदानावर अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. 

कर्णधार मनप्रीत सिंग याने सरदारविषयी सांगितले, की या 'पोझिशन'साठी सरदार फार चांगला खेळाडू आहे. येथे येण्यापूर्वी आम्ही अनेक सराव सामने खेळलो. तेव्हा तो 'फुलबॅक' म्हणून खेळला. तो लांब पासेस अचूकपणे देतो. तो आघाडी फळीच्या दृष्टीने संघाला दिशा देतो. हे संघासाठी फायदेशीर ठरत आहे. 

बांगलादेशला पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 0-7 असे पराभूत व्हावे लागले. त्यांचा कर्णधार रशेल महमूद याने सांगितले, की स्पर्धेत अव्वल असलेल्या भारताविरुद्ध सरस कामगिरी करायची असेल तर आम्हाला खेळ उंचावण्याची गरज आहे. आम्ही पाकविरुद्ध फारच चुका केल्या. आमची सुरवात खराब झाली, पण त्याचा मनोधैर्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. 

प्रशिक्षक म्हणून मी सदैव परखड मूल्यमापन करतो. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर शंभर टक्के आनंदी नाही असेच मला म्हणावे लागेल. पहिला सामना झाल्यामुळे सुरवातीचे दडपण निघून गेले आहे. त्यामुळे आम्ही खेळ उंचावण्यावर आणखी लक्ष केंद्रित करू शकतो. 
- जोएर्ड मरीने, भारताचे मुख्य प्रशिक्षक