तिरंगी हॉकीत जर्मनी ठरले भारताला भारी

तिरंगी हॉकीत जर्मनी ठरले भारताला भारी

मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला पराजित करून तिरंगी हॉकी स्पर्धेतील विजेतेपदाच्या आशा निर्माण केलेल्या भारतास ऑलिंपिक ब्राँझपदक विजेत्या जर्मनीविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात ०-२ अशी हार पत्करावी लागली. या पराभवामुळे भारतास या स्पर्धेत अखेरच्या तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

भारताला विजेतेपदासाठी अखेरच्या साखळी लढतीत विजय आवश्‍यक होता. भारताने आक्रमक सुरवातही करताना दुसऱ्या मिनिटास पेनल्टी कॉर्नर मिळविला; पण ही संधी दवडल्यानंतर भारतीयांनी सातव्या मिनिटास गोल स्वीकारला आणि त्यानंतर भारताची पीछेहाटच होत गेली. जर्मनीने सात गुणांसह बाजी मारली आणि भारत चार गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर गेला.

बेल्जियमविरुद्ध पराभवानंतर परतीच्या लढतीत भारताने विजय मिळविला होता; पण जर्मनीविरुद्ध बरोबरीनंतर परतीच्या लढतीत हार स्वीकारत विजेतेपदाची संधी भारताने दवडली. भारतास विजेतेपदासाठी केवळ विजय पुरेसा होता; पण तेही साधले नाही. 

पहिला गोल स्वीकारल्यानंतर जर्मनीने भले चेंडूवर जास्त हुकमत राखली नसेल; पण त्यांचा खेळ जास्त योजनाबद्ध होता. विजेतेपद जिंकण्याची संधी असूनही भारतीय खेळात जोश नव्हता. जर्मनीचे बॅकपासही भारताची डोकेदुखी ठरत होते. जर्मनीच्या नियंत्रित आक्रमणास भारतीयांनी चांगले उत्तरही दिले होते; पण त्यांच्या नवोदितांचा खेळ पाहून ड्रिबलिंग हॉकीत अजूनही मोलाचे असल्याचे जाणवत होते. मैदानाच्या मध्य भागात वर्चस्व राखणारे भारतीय आक्रमक गोलक्षेत्रात हुकूमत राखणार, याची काळजी जर्मनीच्या बचावपटूंनी घेतली. तिसऱ्या सत्रापासून जर्मनीची प्रतिआक्रमणे जास्त वेगवान झाली आणि भारतीय बचावफळीवरील दडपण वाढत गेले. अखेरच्या काही मिनिटांत भारतीयांनी गोलरक्षकास बदलण्याची चाल खेळली. त्यामुळे भारतीय बचाव कमकुवत झाल्याचा फायदा घेत जर्मनीने सामन्यातील अखेरच्या मिनिटास गोल करीत लढतीचा निर्णय केला.

भारताने चेंडूवर जास्त हुकमत राखली; पण आमचा बचाव जास्त भक्कम होता. त्यात केलेले काही प्रयोग यशस्वी झाले. आमच्या प्रतिआक्रमणांनी भारतावर दडपण आणले. नवोदित संघाने केलेली चांगली कामगिरी नक्कीच मोलाची आहे. 
- स्टिफन केमास, जर्मनीचा अव्वल खेळाडू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com