भारतीय महिलांची जबरदस्त आगेकूच

भारतीय महिलांची जबरदस्त आगेकूच

काकामिगहारा (जपान) - भारतीय महिलांनी आशिया करंडक हॉकी स्पर्धेतील आपली जबरदस्त आगेकूच कायम राखली. ‘अ’ गटातील दुसऱ्या सामन्यात त्यांनी धोकादायक मानल्या जाणाऱ्या चीनचा अडथळा ४-१ असा सहज पार केला. 

येथील कावासाकी मैदानावर सोमवारी झालेल्या सामन्यात भारताकडून गुरजित कौर, नवज्योत कौर, नेहा गोयल, राणी यांनी गोल केले. पहिल्या सामन्यात त्यांनी सिंगापूरचा १०-० असा धुव्वा उडवला होता.

भारतीय महिलांची वेगवान सुरवात चीनला अपेक्षित नव्हती. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले. सामन्याच्या १५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवून भारताने आपले वर्चस्व दाखवण्यास सुरवात केली. सहाजिकच चीनला बॅकफूटवर राहावे लागले. अर्थात, हा पहिला कॉर्नर सत्कारणी लावण्यात भारतीय महिलांना अपयश आले. पहिले सत्र कोरेच राहिले. दुसऱ्या सत्रापासून मात्र भारताच्या वेगवान खेळाला यश येऊ लागले. गुरजितने १९व्या मिनिटाला मिळालेला कॉर्नर सत्कारणी लावला. भारतीय महिलांनी गोलवरील ताबा अधिक राखून चीनच्या कक्षातच खेळ केला. मात्र, त्यांचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.

विश्रांतीला भारताची आघाडी १-० अशी मर्यादित राहिली. उत्तरार्धात मात्र पुन्हा एकदा भारतीय महिलांनी जोरदार खेळ केला. उत्तरार्धात सामन्याच्या ३२व्या मिनिटाला नवज्योत कौरने भारताची आघाडी वाढवली. आक्रमणाच्या नादात बचावात काहिशा ढिलाईपणाची चूक भारताला ३८व्या मिनिटाला महाग पडली. चीनच्या क्वीउझिया कुई हिने कॉर्नर सत्कारणी लावत चीनचा गोल केला. अखेरच्या टप्प्यात खेळ कमालीचा वेगवान झाला. चीनने बरोबरी साधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. पण, भारताच्या प्रतिआक्रमणामुळे त्यांना बचावावर लक्ष देणे भाग पडले. सामन्याच्या ४९व्या मिनिटाला नेहा गोयलने चीनची गोलरक्षक जिआओ ये हिला चकवून भारताची आघाडी वाढवली. त्यानंतर अखेरच्या दहा मिनिटात पेनल्टी कॉर्नर मिळविण्याची स्पर्धा झाली. यात भारताने दोन, तर चीनने एक कॉर्नर मिळविला. मात्र, यातील एकही कॉर्नर सत्कारणी लागला नाही. सामन्याच्या ५८व्या मिनिटाला भारताची कर्णधार राणीने मैदानी गोल करून चीनवरील विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. भारताचा सामना उद्या मलेशियाशी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com