भारताकडून हॉकीत पाकचा पुन्हा धुव्वा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

लंडन - क्रिकेटमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध निराशा केली असली, तरी हॉकीपटूंनी विजयाचा झेंडा तसाच फडकावत ठेवला. जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत सात दिवसांत दोनदा पाकिस्तानला पराभूत करण्याची धमक भारताने दाखवली. पहिला विजय ७-१, तर आजचा विजय ६-१ असा होता. पाचवे किंवा सहावे स्थान मिळवण्यासाठी भारताचा आता कॅनडाशी सामना होईल. 

गेल्या रविवारी चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध शरणागती स्वीकारली होती, पण हॉकी संघाने पाकिस्तानचा साखळी सामन्यात ६-१ असा धुव्वा उडवून भारतीय प्रेक्षकांना दिलासा दिला होता. आजही याच फरकाने पाकिस्तानला पुन्हा चीत केले. 

भारताकडून रमणदीप सिंगने (७ आणि २७ मि.) आणि आकाशदीप सिंग (१२ आणि २७ मि.), हरमनप्रीत (३६ मि.), तर मनदीप सिंग (५९ मि.) यांनी गोल केले. पाकिस्तानचा एकमेव गोल ऐजाझ अहमदने ४१ व्या मिनिटाला केला.
गेल्या रविवारी पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले असले तरी भारतीय हॉकी संघाने, क्रिकेट संघाने बाळगलेल्या अतिआत्मविश्‍वाची चूक केली नाही. पाकिस्तानला डोके वर काढू न देण्याचा आक्रमक खेळ केला आणि पहिल्या क्वॉर्टरमध्ये पाकिस्तानच्या गोलजाळ्याजवळच खेळ केला आणि याचा फायदा लगेचच मिळाला. आठव्या मिनिटाला रमणदीपने रिव्हर्स फ्लिकने गोल केला. चार मिनिटांनंतर आकाशदीपला भारताची आघाडी वाढवण्याची संधी मिळाली होती. रमणदीपकडून त्याला चांगला पास मिळाला होता, त्या वेळी पाकिस्तानच्या गोलरक्षकालाच केवळ चकवायचे होते, पण त्याने मारलेला चेंडू बाहेर गेला.

या एका हुकलेल्या संधीचा अपवाद वगळता भारतीयांनी गोलांचा धडाका लावला. ५-० अशी आघाडी भारताचा विजय निश्‍चित करणारी होती आणि पाकिस्तानला पुनरागमनाची अजिबात संधी न देणारी होती.