श्रीजेश पाच महिन्यांसाठी ‘आउट’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नवी दिल्ली - भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेश गुडघ्याच्या दुखापतीमुळे पाच महिने खेळू शकणार नाही. यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेस त्याला मुकावे लागणार आहे.

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धे दरम्यान श्रीजेशच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर तो हॉकीपासून दूरच आहे. त्याची गैरहजेरी भारतीय संघाला गेल्या आठवड्यात झालेल्या वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीच्या टप्प्यात प्रकर्षाने जाणवली. गेल्याच आठवड्यात मुंबईत डॉ. अनंत जोशी यांनी श्रीजेशच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून, त्याला पूर्ण क्षमतेने मैदानात उतरण्यासाठी किमान पाच महिन्यांचा कालावधी लागेल असे भारतीय संघाचे हाय परफॉर्मन्स संचालक डेव्हिड जॉन यांनी सांगितले. श्रीजेश हॉकी वर्ल्ड लीगच्या अंतिम टप्प्यातील स्पर्धेत खेळू शकणार असला, तरी त्याला आशिया करंडक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. श्रीजेशच्या दुखापतीमुळे भारताला गोलरक्षकांची दुसरी फळी भक्कमपणे उभी करावी लागणार आहे. सध्या विकास दहिया आणि आकाश चिकटे हे तरुण असले, तरी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत.