भारतीय महिलांसमोर आज इंग्लंडचे खडतर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई/जोहान्सबर्ग - वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या स्पर्धेत जेमतेमच उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या भारतीय महिला संघास स्पर्धेतील सर्वोत्तम मानांकन असलेल्या इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. अखेरच्या साखळी लढतीत बलाढ्य अर्जेंटिनाची आक्रमणे अखेरच्या दोन सत्रांत रोखणाऱ्या भारताकडून धक्कादायक निकालाची माफक आशाच आहे.

आफ्रिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत ‘अ’ गटात चौथ्या आलेल्या भारतास ‘ब’ गट विजेत्या इंग्लंडचा मुकाबला करावा लागणार आहे. जागतिक क्रमवारीत दुसरे असलेल्या इंग्लंडने स्पर्धेत तीन लढती जिंकताना केवळ जपानविरुद्ध धक्कादायक हार पत्करली आहे. आयर्लंडला पराजित करताना त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. 

इंग्लंड भारतास दुर्लक्षित करणार नाही. त्यांनी भारत-अर्जेंटिना लढतीचा चांगला अभ्यास केला असेल. या सामन्यात भारत ०-३ पराजित झाला, पण विश्रांतीनंतरच्या दोन सत्रात गोलरक्षक सविता, तसेच रजनीच्या सहकार्याने उंचावलेला बचाव नक्कीच संघाचा आत्मविश्‍वास उंचावणारा होता. पहिल्या दोन सत्रात भारतीयांचे आव्हानही दिसत नव्हते, पण त्यानंतरच्या दोन सत्रांत अर्जेंटिना बचावफळीवरही प्रसंगी दडपण आले होते. अर्थात पेनल्टी कॉर्नरवर भारतीय कमी पडले होते.  अर्जेंटिनास नऊ पेनल्टी कॉर्नरवर भारतीयांनी गोलपासून रोखले. तिसऱ्या व चौथ्या सत्रात बदली गोलरक्षक रजनीने अर्जेंटिनाचा धडाका रोखला. मात्र पुन्हा एकदा वंदना कटियार आणि राणी रामपाल यांच्याच चाली प्रभावी होत्या. मात्र त्यांना पुरेशी साथ लाभली नाही. चेंडूवरील गमावली जाणारी हुकूमतही चिंतेची बाब आहे. भारतास या स्पर्धेत आतापर्यंत त्यांच्यापेक्षा कमी मानांकन असलेल्या संघाविरुद्धच हार टाळता आली आहे. टॉप टेनमधील संघांविरुद्ध तीन गोलच्या फरकाने हार पत्करली आहे.