वर्ल्डकप थेट प्रवेशासाठी भारतास विजय हवाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

वर्ल्ड हॉकी लीगमध्ये आज जपानशी लढत

मुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेचे थेट तिकीट मिळवण्यासाठी भारतीय महिला संघास वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्याच्या स्पर्धेत उद्या (ता. २०) जपानविरुद्ध विजय आवश्‍यक आहे. ही लढत गमावल्यास भारतीय महिलांचा विश्‍वकरंडक पात्रतेचा मार्ग जास्त खडतर होईल.

जोहान्सबर्गला सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने अखेरच्या साखळी लढतीत अर्जेंटिनाचा, तसेच उपांत्यपूर्व फेरीत प्रसंगी इंग्लंडचा कस पाहिला होता. आता त्यापेक्षा सरस खेळ जपानविरुद्ध अपेक्षित आहे. जपानने साखळीत इंग्लंडला १-० असे पराजित केले होते. त्यामुळे भारतास जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा खालच्या स्थानावर असलेल्या जपानविरुद्धचा विजय गृहीत धरता येणार नाही. 

पेनल्टी कॉर्नरवरील अपयश, सदोष नेमबाजी, मोक्‍याच्यावेळी चेंडूवर गमावला जाणारा ताबा, गोलरक्षक सोडल्यास बचावात होणाऱ्या चूका यावर मात करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. वंदना कटारिया, राणी रामपाल या आक्रमकांना चांगली साथ दिली तरच भारतास विजयाची आशा बाळगता येईल. 

इंग्लंडमुळेच संधी
खर तर उपांत्य फेरीच्या टप्प्यातील पाचच संघांना थेट प्रवेश असतो, पण या स्पर्धेतील इंग्लंड अव्वल पाचमध्ये नक्की झाले आणि या स्पर्धेतील सहा संघांना प्रवेश लाभणार हे निश्‍चित झाले. आता उद्या जपानविरुद्ध पराजित झाल्यास भारतास विश्वकरंडक थेट पात्रतेसाठी आशिया कप स्पर्धा जिंकणे भारतास भाग पडेल. हेही साध्य न झाल्यास आपल्यापेक्षा पुढे असलेल्या संघांनी विभागीय स्पर्धा जिंकावी ही आशा बाळगणे भाग पडेल.