'एफआयएच'कडून सहभागी संघ निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

ल्युसाने - पुरुषांच्या वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या संघांचा सहभाग आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) निश्‍चित केला. ही स्पर्धा 15 ते 25 जूनदरम्यान लंडन येथे पार पडणार आहे.

ल्युसाने - पुरुषांच्या वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या संघांचा सहभाग आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) निश्‍चित केला. ही स्पर्धा 15 ते 25 जूनदरम्यान लंडन येथे पार पडणार आहे.

उपांत्य फेरीच्या पहिल्या स्पर्धेत लीगच्या दुसऱ्या फेरीतून पात्र ठरलेले कॅनडा, मलेशिया, चीन, स्कॉटलंड यांच्यासह ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अर्जेंटिना, युरोपियन विजेते नेदरलॅंड्‌स, आशियाई विजेता भारत, पाकिस्तान, कोरिया आणि यजमान इंग्लंड हे संघ सहभागी होणार आहेत.

उपांत्य फेरीची दुसरी स्पर्धा जोहान्सबर्ग येते 8 ते 23 जुलै दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेत दुसऱ्या फेरीतून पात्र ठरलेले आयर्लंड, जपान, फ्रान्स, इजिप्त यांच्याबरोबर जगज्जेता, लीग विजेता आणि चॅंपियन्स विजेता ऑस्ट्रेलिया, ऑलिंपिक रौप्यपदक विजेता बेल्जियम, ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता जर्मनी, न्यूझीलंड, स्पेन आणि यजमान दक्षिण आफ्रिका हे संघ सहभागी होणार आहेत.

हॉकी वर्ल्ड लीगची दुसरी फेरी झाल्यानंतर निश्‍चित करण्यात आलेल्या जागतिक क्रमवारीनुसार या संघांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ऑलिंपिक विजेत्या अर्जेंटिनाला अव्वल, तर ऑस्ट्रेलियाला दुसरे स्थान मिळाले आहे. या दोन्ही स्पर्धेतील अव्वल संघ पुढील वर्षी होणाऱ्या हॉकी वर्ल्ड लीग फायनल्स आणि 2018 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या दोन्ही स्पर्धा भारतात भुवनेश्‍वर येथे होणार आहेत.