अटल चषकावर ‘पीटीएम’चे नाव...

अटल चषकावर ‘पीटीएम’चे नाव...

कोल्हापूर - खचाखच भरलेल्या मैदानात पाटाकडील तालीम मंडळाने (अ) प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबवर (अ) २ विरुद्ध १ गोल फरकाने मात करत अटल चषकावर आपले नाव कोरले. पाटाकडीलने ईर्षेने खेळ करत यंदाच्या हंगामात विजेतेपदाची हॅट्‌ट्रिक साधली. स्पर्धेतील पाच लाख रुपयांचा मानकरी पाटाकडीलच ठरला.

प्रॅक्‍टिसने जोरदार चढाया करत प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, त्यांच्या चढायांचे रूपांतर गोलमध्ये झाले नाही. नेताजी तरुण मंडळ व कोल्हापूर स्पोर्टस्‌ डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हतर्फे ही स्पर्धा झाली. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले. पाटाकडीलचा ऋषीकेश मेथे-पाटील हा मानकरी ठरला त्याला ७५ हजाराचे दागिने बहाल केले.

चार वाजून पंचवीस मिनिटांनी सामन्यास सुरुवात झाली. चौथ्या मिनिटाला पाटाकडीलच्या एकिमने डाव्या बाजूने प्रॅक्‍टिसच्या गोलक्षेत्रात शिरकाव केला.

ड्रिब्लिंगचा वापर करत प्रॅक्‍टिसच्या खेळाडूंना चकवत त्याने मारलेला चेंडू प्रॅक्‍टिसचा गोलरक्षक राजीव मिरीयालने अडवला. अक्षय मेथे-पाटीलने फटकावलेला चेंडूही त्याने तटवला. रणजित विचारेच्या पासवर ओमकार जाधवने  प्रॅक्‍टिसच्या गोलक्षेत्रातून हेडद्वारे टोलवलेला चेंडू मात्र त्याला अडवता आला नाही. चेंडू १० व्या मिनिटाला थेट गोल जाळीत शिरला आणि `नाद खुळा पिवळा-निळा`च्या निनादाने स्टेडियम दणाणले.

प्रॅक्‍टिसचा उत्कृष्ट बचावपटू फ्रान्सिस मैदानात न उतरल्याने प्रॅक्‍टिसच्या बचावफळीवर ताण आला होता. या वेळेत प्रॅक्‍टिसचा सागर चिले पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात चेंडूला मोक्‍याच्या क्षणी फटका मारण्यात कमी पडला. इंद्रजित चौगुलेच्या कॉर्नर किकवर कैलास पाटीलने हेडद्वारे मारलेला चेंडू पाटाकडीलच्या गोल जाळीवरून गेला. त्यानंतर पाटाकडीलच्या एकिमने प्रॅक्‍टिसच्या बचावफळीत मुसंडी मारत मारलेला चेंडू गोलरक्षक मिरीयालने अडवला. पण, परतलेल्या चेंडूवर ओंकार जाधवने मारलेला फटका गोलजाळीवरून गेला.

उत्तरार्धात प्रॅक्‍टिसचा कैलास चमत्कार घडवेल, अशी अपेक्षा होती. त्याने गोल करण्यासाठी जिवाचे रान केले. मात्र, पाटाकडीलच्या भक्कम बचावफळीने त्याची कोंडी केली. त्यातूनही त्याने अप्रतिम फटके मारले. उत्तरार्धातील पाटाकडीलच्या ऋषीकेश मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर एकिमने गोलरक्षक राजीवला चकवत ५३ व्या मिनिटाला गोल नोंदवला. प्रॅक्‍टिसचा अभिजित शिंदे  एकिमला रोखण्यात कमी पडला.  प्रॅक्‍टिसच्या फेनियनने मारलेला चेंडू पाटाकडीलचा गोलरक्षक विशाल 

नारायणपुरेने अडवला. 
या वेळेत मैदानात उतरलेल्या अजित पोवारने लगावलेला चेंडू पाटाकडीलच्या गोल जाळीजवळून गेला आणि प्रॅक्‍टिसचे समर्थक हळहळले. त्यानंतर कॉर्नर किकवर प्रतीक बदामेने मारलेल्या चेंडूवर फेनियनने फटका मारला. गोलरक्षक विशालने तो वेळीच अडवला. प्रथमेश यादवच्या पासवर फेनियनने हेडद्वारे चेंडूस गोलजाळीच्या दिशेने टोलवले. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. दुखापतीमुळे ऋषीकेश मेथे-पाटील मैदानाबाहेर गेला असला तरी पाटाकडीलच्या आक्रमणाची धार कमी झाली नाही. सामना संपण्यास काही क्षण बाकी असताना प्रॅक्‍टिसच्या खेळाडूला अवैधरीत्या अडवल्याने प्रॅक्‍टिसला पेनल्टी बहाल केली. त्यावर प्रॅक्‍टिसच्या प्रतिक बदामेने गोल केला. 

‘कोल्हापूर कोल्हापूर’गीतांची धून
सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अनिकेत जाधव, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू व गायक, संगीतकार अवधूत गुप्ते मैदानावर येताच प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्या वाजवल्या. मैदानात लावलेल्या स्क्रीनवर त्यांची छबी पाहताना प्रेक्षकांतून जल्लोष होत होता. बक्षीस वितरणावेळी अवधूत गुप्ते यांनी ‘कोल्हापूर कोल्हापूर’ हे गीत गात प्रेक्षकांची मने जिंकली. 

अनिकेतची ‘तेज’ सवारी...
सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, ‘ए’ लायसन्स फुटबॉल प्रशिक्षक अंजना तुरंबेकर, आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अनिकेत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. अनिकेतला सुझुकी गाडी प्रदान करण्यात आली. त्याने तेजस्विनीसमवेत गाडीवरुन मैदानात फेरफटका मारला. पाठोपाठ जीपमध्ये अंजना तुरंबेकर होती. तिचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक झाले. सामना संपल्यानंतर तेजस्विनी व रिंकू यांनी जीपमधून फेरफटका मारला. मोबाईलद्वारे त्यांचे छायाचित्र टिपण्यास झुंबड उडाली.

माता व बहिणींचा सन्मान....
दोन्ही संघांतील खेळाडू आपापल्या माता बहिणींसमवेत मैदानावर आले. या वेगळ्या कल्पकतेला प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली. त्यांची स्टेडियममध्ये विशेष बैठक व्यवस्थाही केली होती. अनेक खेळाडूंच्या मातांनी तर आज प्रथमच खचाखच भरलेले मैदान आणि त्या मैदानात खेळणारा आपला मुलगा असा प्रत्येक खेळाडूंच्या खेळाचा क्षण आईने डोळ्यात साठवला..

मंडप कोसळला...
सामन्यात पाटाकडीलच्या ओमकार जाधवने गोल केला. केएसए कार्यालयाकडे बसलेल्या महिलांनी त्यास दाद दिली आणि नेमका त्याचवेळी मंडप काही महिलांच्या अंगावर कोसळला. काही महिला त्यात जखमी झाल्या. संयोजकांनी प्रसंगावधान राखून मंडप सावरला. तसेच महिलांवर तत्काळ उपचार केले.  

पाटाकडील                       प्रॅक्‍टिस 
 डायरेक्‍ट किक- ३      - डायरेक्‍ट किक-५
 कॉर्नर किक-  ४      - कॉर्नर किक- ६
 चेंडूवर नियंत्रण- ५० टक्के     - चेंडूवर नियंत्रण-५०टक्के

सर्वाधिक गोल करणारे संघ 
 पाटाकडील (अ)     १३
 प्रॅक्‍टिस (अ)     ९
 दिलबहार (अ)    ७
 बालगोपाल-     ५

सर्वाधिक गोल करणारे खेळाडू 
 ऋषीकेश मेथे-पाटील (पाटाकडील)     ७
  राहुल पाटील (प्रॅक्‍टिस)-     ३
 इमॅन्युएल (दिलबहार)-    ३
 एकिम (पाटाकडील) -    ३
कार्ड
 रेड      ६
 यलो    ३४

उत्कृष्ट खेळाडू असे :
 मालिकावीर- ऋषीकेश मेथे-पाटील (पाटाकडील)
 सामनावीर- एकिम (पाटाकडील), कैलास पाटील (प्रॅक्‍टिस)
 फॉरवर्ड - राहुल पाटील (प्रॅक्‍टिस)
 हाफ- ओंकार जाधव (पाटाकडील)
 डिफेन्स- माणिक पाटील (प्रॅक्‍टिस)
 गोलरक्षक- विशाल नारायणपुरे (पाटाकडील) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com