अनुष्का, जान्हवीची राष्ट्रीय नेमबाजीत सुवर्णभरारी...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

कोल्हापूर - स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने क्रीडा व युवक संचालनालय यांनी बालेवाडी-पुणे येथे १ ते ५ डिसेंबर दरम्यान घेतलेल्या ६३ व्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुष्का रवींद्र पाटील व जान्हवी रवींद्र पाटील या दोघी बहिणींनी प्रत्येकी दोन पदके मिळविली. 

कोल्हापूर - स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने क्रीडा व युवक संचालनालय यांनी बालेवाडी-पुणे येथे १ ते ५ डिसेंबर दरम्यान घेतलेल्या ६३ व्या शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुष्का रवींद्र पाटील व जान्हवी रवींद्र पाटील या दोघी बहिणींनी प्रत्येकी दोन पदके मिळविली. 

जान्हवी व अनुष्काची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली होती. ३० राज्यांमधील १३०० च्या वर मुला-मुलींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. जान्हवीने ४०० पैकी ३७१ गुण मिळवून १९ वर्षांखालील गटात वैयक्तिक रौप्य व सांघिक सुवर्णपदक मिळविले. तिने राबिआ काकतीकर व शिवानी साटम यांच्या सहकार्याने ११०२ गुण मिळवून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. चंदीगडला (१०९३) रौप्य, तर सिबीएससी (१०७८) संघाला कांस्यपदक मिळाले. अनुष्काने ४०० पैकी ३७९ गुण मिळवून १७ वर्षांखालील गटात वैयक्तिक सुवर्ण व सांघिक सुवर्णपदक मिळविले. तिने गौरी कामत व कस्तुरी गोरे  यांच्या सहकार्याने महाराष्ट्राला ११०६ गुणांसह सुवर्णपदक मिळवून दिले

सिबीएससीला (११००) रौप्य, तर चंदीगड (१०९२) संघाला कांस्यपदक मिळाले. अनुष्काने यापूर्वीच भारतासाठी आंतरराष्ट्रीय  सुवर्णपदक आणले आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवीने कमी कालावधीमध्ये नेमाबाजीचे प्रशिक्षण घेऊन लवकरच बहिणीबरोबर भारताच्या संघामधून आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचे स्वप्न ऊरी बाळगले.

जान्हवी टिंबर मार्केटमधील ऑलिम्पिक शूटिंग रेंजमध्ये विनय पाटील यांच्या, तर अनुष्का क्रीडाप्रबोधिनीचे प्राचार्य माणिक वाघमारे व प्रशिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुधाळी येथील छत्रपती संभाजीराजे शूटिंग रेंजवर सराव करते. अनुष्का व जान्हवी दोघी विमला गोयंका इंग्लिश मीडियम   स्कूलमध्ये अनुक्रमे १० वी व ९ वी मध्ये शिकत असून, त्यांना क्रीडाशिक्षक योगेश माने, मुख्याध्यापक सायली जोशी यांचे प्रोत्साहन लाभले.

अनुष्काचा कस...
अनुष्काने दिल्ली येथे १० व्या एशियन अजिंक्‍यपद स्पर्धेची तयारी सुरू असताना महाराष्ट्राच्या संघासाठी २ डिसेंबरला धावपळ करत येऊन स्पर्धा खेळून लगेचच ३ डिसेंबरला रात्री एशियन स्पर्धेसाठी टोकियो (जपान) येथे रवाना झाली आहे. अनुष्का या एशियन अजिंक्‍यपद स्पर्धेमध्ये भारतासाठी पदक व यूथ ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा आणण्यासाठी कस लावणार आहे.

Web Title: Kolhapur News Aunshka, Janhvi success in National Shooting