लेंडल यांच्यामुळेच कारकीर्द उंचावली - मरे

लेंडल यांच्यामुळेच कारकीर्द उंचावली - मरे

लंडन - क्‍ले कोर्टवरील अपयशाने चक्रावलो होतो, काय करायचे ते सुचत नव्हते. अशा वेळी इव्हान लेंडल यांची आठवण झाली. त्यांनी माझा खेळ बघून अगदी मला जणू काही सुरवातीपासून धडे द्यायला सुरवात केली. ही पद्धत मला आश्‍चर्यकारक होती. पण, याचा फायदा झाला. लेंडल यांचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर माझ्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले आणि त्यांच्यामुळेच माझ्या कारकिर्दीचा आलेख गेल्या काही मोसमात उंचावला, अशी प्रतिक्रिया ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याने व्यक्त केली. येथे आयोजित एका छोट्या कार्यक्रमात मरे याने आपल्या कारकिर्दीचा आढावा घेतला. तो म्हणाला, ‘‘क्‍ले कोर्टवर माझा खेळ कधीच चांगला होत नाही.

त्यात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा तोंडावर असताना त्यापूर्वी झालेल्या एका क्‍ले कोर्टवरील सामन्यात सपाटून मार खाल्ला. खडबडून जागा झालो आणि लेंडल यांना फोन केला. ते अमेरिकेत फ्लोरिडा येथे होते. मनासारखा खेळ होत नाही. तुमच्या मदतीची गरज आहे. बस इतकेच बोललो आणि लेंडल लगेच मला येऊन मिळाले. मला खेळताना पाहून ते चकित झाले आणि तुझ्या खेळात इतक्‍या चुकांनी घर केले याची मला कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली.’’

त्यांच्याबरोबर मार्गदर्शन करण्यास सुरवात केली, तेव्हा अगदी साध्या फटक्‍यांपासून सुरवात केल्याचे सांगून मरे म्हणाला, ‘‘साधे सरळ फटके मारण्यापासून त्यांनी माझी शिकवणी घेतली. एकेक फटका त्याच एकाग्रतेने वारंवार मारणे हे थकवणारे आणि कंटाळवाणे असते. पण, त्यांनी ऐकले नाही. लेंडल यांनी माझ्या अंगात आणि मनात असलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी योजना आखल्या. त्याचा परिणाम फेंच ओपन स्पर्धेत दिसून आला. क्‍ले कोर्टवर खेळताना प्रतिस्पर्ध्याला गुण घेण्यासाठी झगडायला लावणे इतकेच माझे ध्येय होते. पण, लेंडल यांच्या मार्गदर्शनाने इतकी सुधारणा झाली की मी थेट उपांत्य फेरी गाठली. आता विंबल्डन स्पर्धेत मला अधिक नव्या उत्साहाने उतरायचे आहे.’’

ब्रिटनची आशा
विंबल्डन स्पर्धेत अँडी मरे याच्यावर यजमान ब्रिटनच्या आशा केंद्रित आहेत. वाव्रींका, नदालचा खेळ ग्रास कोर्टवर बहरत नाही. जोकोविचही फॉर्ममध्ये नाही. फेडररही ‘टच’मध्ये नसल्यामुळे पुन्हा एकदा ब्रिटिश चाहते मरे विंबल्डन जिंकेल अशी आशा बाळगून आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com