Maria Sharapova
Maria Sharapova

'चीटर' शारापोवा बुशार्डकडून चकित

माद्रिद (स्पेन) : कॅनडाच्या युजेनी बुशार्डने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेत मारिया शारापोवाला तीन तास चाललेल्या मॅरेथॉन लढतीत हरविले. 'ड्रग टेस्ट'मध्ये दोषी आढळलेली शारापोवा 'चीटर' असल्याचे परखड वक्तव्य युजेनीने अलीकडेच केले होते. या लढतीपूर्वी अनेक स्पर्धकांनी शुभेच्छा दिल्या, अनेकांनी संदेश पाठविले. त्यामुळे प्रेरित झाले. स्वतःसाठी आणि मुख्य म्हणजे अशा व्यक्‍तीसांठी जिंकण्याच्या जिद्दीने खेळल्याची प्रतिक्रिया युजेनीने व्यक्त केली. 

युजेनीने 7-5, 2-6, 6-4 असा विजय मिळविला. आता तिच्यासमोर अँजेलिक केर्बरचे आव्हान असेल. युजेनी जागतिक क्रमवारीत 60व्या स्थानावर आहे. स्टुटगार्टमधील स्पर्धेत शारापोवाने पुनरागमन केले. तेव्हा तिला 'वाइल्ड कार्ड' देण्यात आले होते.

त्याबद्दल युजेनीने सांगितले होते की, 'शारापोवा एक चिटर आहे. कोणत्याच खेळात चीटरला जागा असते असे मला वाटत नाही. तिला पुन्हा खेळायची परवानगी द्यायला नको होती. 'डब्ल्यूटीए'ने नवोदित खेळाडूंना चुकीचा संदेश दिला आहे. तुम्ही फसवणूक करा, तरी सुद्धा तुमचे सहर्ष स्वागत होईल असाच हा संदेश आहे. तो काही योग्य आहे असे वाटत नाही.' याविषयी प्रतिक्रिया विचारली असता शारापोवा म्हणाली होती की, 'मी अशा क्षुल्लक गोष्टींपेक्षा कितीतरी सरस आहे.' 

या पार्श्‍वभूमीवर दोघी कोर्टवर उतरल्या तेव्हा त्यांच्यात कटुता असल्याचे जाणवत नव्हते. सामन्यापूर्वी त्यांनी नेहमीसारखे 'नॉक अप' केले. त्यानंतर मात्र दोघी चुरशीने खेळल्या. पहिल्या सेटमध्ये त्यांनी एकमेकींची सर्व्हिस भेदली. त्यानंतर 11व्या गेममध्ये बुशार्डचा सोपा फोरहॅंड चुकला; पण चौथ्या ब्रेकपॉइंटवर तिने आघाडी घेतली. हा गेम 12 मिनिटे चालला. मग सर्व्हिस राखत तिने पहिला सेट जिंकला. हा सेट एक तास दहा मिनिटे चालला. 

दुसऱ्या सेटमध्ये शारापोवाने सलग चार गेम जिंकले. तिच्या धडाक्‍यासमोर युजेनीचे फटके चुकत होते. शारापोवाने हा सेट जिंकून बरोबरी साधली. मग निर्णायक सेटमध्ये आणखी चुरस झाली. दोघींनी 0-40 पिछाडीवरून सर्व्हिस राखली. शारापोवाने सलग दोन सर्व्हिस गेममध्ये चिवट खेळ केला. तिसऱ्या वेळी मात्र तिला हे साध्य झाले नाही. मग युजेनीनेही अशीच सर्व्हिस गमावली. त्यानंतर मात्र शारापोवाने 40-15 आघाडीवरून सर्व्हिस गमावली. मग युजेनीने पाचव्या 'मॅचपॉइंट'वर विजय नक्की केला. कारकिर्दीत पाच सामन्यांत तिने शारापोवाला प्रथमच हरविले. 

नेटपाशी हस्तांदोलन 
सामन्यानंतर दोघींनी नेटपाशी औपचारिक हस्तांदोलन केले. शारापोवाने 'वेल प्लेड' म्हटल्याचे युजेनीने सांगितले. शारापोवाच्या खेळाविषयी युजेनी म्हणाली, ''कथित पुनरागमनानंतर ती चांगला खेळ करते आहे.'' शारापोवा म्हणाली, ''मी लढाऊ खेळ करते. हरल्यामुळे मी नक्कीच निराश झाले आहे, पण असेच सामने खेळून माझा खेळ उंचावेल.'' 

पुढे काय? 
या पराभवामुळे शारापोवाला विंबल्डनच्या मुख्य ड्रॉमध्ये थेट प्रवेश मिळणार नाही. पुढील आठवड्यात रोममध्ये होणाऱ्या स्पर्धेत तिला किमान उपांत्य फेरी गाठावी लागेल. तेथे पहिल्या फेरीत हरल्यास तिला पात्रता फेरीतही स्थान मिळू शकणार नाही. त्यासाठी तिला 'वाइल्ड कार्ड'वरच अवलंबून राहावे लागेल. 

आणखी एक 'वाइल्ड कार्ड' 
शारापोवाला 'वाइल्ड कार्ड'ची खिरापत वाटणे सुरूच आहे. बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या एगॉन क्‍लासिक स्पर्धेसाठी 'लॉन टेनिस असोसिएशन'ने तिला 'वाइल्ड कार्ड' दिल्याचे वृत्त 'टाइम्स'ने प्रसिद्ध केले. तिने 2005 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. यापूर्वी 2010 मध्ये तिने भाग घेतला होता. ही स्पर्धा 17 ते 25 जून दरम्यान होईल. विंबल्डनच्या पूर्वतयारीसाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com