नदाल, जोकोविचचा सहज विजय

Nadal
Nadal

मेलबर्न - नोव्हाक जोकोविच, रॅफेल नदाल यांनी अपेक्षेनुसार ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र त्यापेक्षाही टेनिसपटू; तसेच यंदा उष्ण हवामानाच्या लाटेचा फटका बसणार नसल्याचा अंदाज जाहीर झाल्याने रसिक जास्त सुखावले आहेत.

गतविजेत्या जोकोविचने स्पेनच्या फर्नांडो वेर्दोस्को याचा ६-१ ७-६ (७-४) ६-२ असा सहज पराभव केला. गतवर्षी पहिल्या फेरीत पराजित झालेल्या नदालने जर्मनीच्या फ्लोरियन मेयर याला ६-३ ६-४ ६-४ असे पराजित केले. नदालसमोर मार्कोस बगधाटिस याचे आव्हान असेल.

पहिला सेट सहज जिंकल्यावर जोकोविचने दुसऱ्या सेटच्या सुरवातीस सर्व्हिस गमावली होती. मात्र प्रतिस्पर्ध्यांच्या चुकांचा फायदा घेत जोकोविचने विजय सुकर केला. ही स्पर्धा मला घरचीच स्पर्धा वाटते. येथील यशाच्या सुखद आठवणी सुखावतात. ड्रॉ पाहिल्यावर केवळ सलामीच्या लढतीकडेच लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे, याची खात्री पटली, असे जोकोविचने सांगितले. 

मनगटाच्या दुखापतीमुळे सप्टेंबरपासून चारच लढती खेळलेल्या नदालने सुरवातीपासून हुकमत राखली. उष्ण हवामानास दाद न देता त्याने झटपट विजय मिळविला. तिसरा मानांकित मिलॉस राओनिक, ब्रिस्बेनचा विजेता ग्रिगॉर दिमीत्रॉव, रिचर्ड गास्क्वेट यांनीही एकतर्फी विजय मिळवले.

महिला एकेरीत सहा वेळच्या विजेत्या सेरेना विल्यम्सने बेलिंडा बेन्सीक हिला ६-४, ६-३ असे हरवले. पस्तीसवर्षीय सेरेनाची प्रतिस्पर्धी १९ वर्षीय होती. नऊ मॅच पॉइंट वाचवणारी ल्युसी सॅफारोवा आता सेरेनाची प्रतिस्पर्धी असेल. काही आठवड्यांपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कॅरोलिन वॉझ्नियाकी, पाचवी मानांकित कॅरोलिन पिस्कोवा यांनी विजयाची औपचारिकता सहज पूर्ण केली. तिसऱ्या मानांकित ॲग्निएस्झका रॅदवंस्का हिला तीन सेटच्या लढतीस सामोरे जावे लागले. 

सव्वा पाच तासांची लढत
क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने अर्जेंटिनाच्या होरॅसिओ झेबॅलिऑस याला सव्वा पाच तास चाललेल्या लढतीत हरवले. इवोने ही लढत ६-७ (६-८) ३-६ ७-५ ६-२ २२-२० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियन स्पर्धा इतिहासातील सर्वात लांबवर चाललेली लढत ठरली. इवोने ८४ गेमपर्यंत रंगलेल्या या लढतीतील २२६ पैकी ११८ गुण जिंकले. 

उष्णतेची लाट नाहीच
दोन वर्षांपूर्वी कडक उन्हामुळे लढत थांबवणे भाग पडले होते, तेच मंगळवारी घडेल हा अंदाज फोल ठरला. तापमान ३८ अंशांपर्यंतच गेले; तसेच उन्हाचा तुलनेत त्रास नव्हता, असेच सांगितले जात होते. बुधवारपासून तापमान कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com