कोचिंग स्टाफला जोकोविचकडून 'ब्रेक' 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

ध्येय साध्य करण्यासाठी मरियन, गेरहार्ड आणि मिल्जॅन यांनी योगदान दिले. त्यांच्या मैत्री, व्यावसायिकता आणि निष्ठेप्रती मी सदैव कृतज्ञ राहीन. त्याशिवाय मला व्यावसायिक कारकिर्दीत उंची गाठता आली नसती; पण आता आम्हा सर्वांनाच बदल करण्याची गरज जाणवली. 
- नोव्हाक जोकोविच, सर्बियाचा टेनिसपटू

माद्रिद : सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दीर्घकाळ साथ दिलेला संपूर्ण कोचिंग स्टाफ बदलला आहे. या 'शॉक थेरपी'नंतर सरस निकाल नोंदविण्यास प्रेरणा मिळेल, अशी त्याला आशा आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून योग्य व्यक्ती मिळेपर्यंत तो 'टूर'वर एकटा खेळेल. 

जवळपास संपूर्ण कारकिर्दीत मार्गदर्शन केलेले प्रशिक्षक मरियन वाज्दा, फिटनेस प्रशिक्षक गेरहार्ड फिल ग्रित्‌श्‍च, फिजिओथेरपिस्ट मिल्जॅन ऍमानोविच या चौघांना जोकोविचने 'ब्रेक' दिला. ही यशस्वी आणि दीर्घकालीन भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय एकमेकांच्या सहमतीने घेतला असे जोकोविचने आपल्या संकेतस्थळावर म्हटले आहे. 

जोकोविचची जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याला काही मानहानिकारक पराभव पत्करावे लागले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये जोकोविचने 'सुपर कोच' म्हणून बोरीस बेकर यांच्याबरोबरील करार संपविला. त्याने तीन वर्षे बेकर यांचे मार्गदर्शन घेतले. या कालावधीत त्याला लक्षणीय यश मिळाले. 

जोकोविच यानंतर माद्रिद ओपनमध्ये सहभागी होईल. त्याने सांगितले की, ''माझी कारकीर्द कायम प्रगतिपथावर राहिली आहे. यावेळी मी प्रयोग करीत आहे. वेगळ्या दिशेने पाऊल टाकल्यास काय होते हे मी पाहीन. मला जास्त भक्कम आणि स्वावलंबी बनून पुन्हा उच्च स्थान मिळवायचे आहे. मी लक्ष्य गाठणारा आहे. कोर्टवर विजयाची प्रेरणा देणारा क्षण मला पुन्हा मिळवायचा आहे.'' 

जोकोविच 122 आठवडे अव्वल स्थानावर होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने त्याला मागे टाकले. जानेवारीत कतार ओपनमध्ये त्याने मरेवर मात केली होती, पण ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो दुसऱ्याच फेरीत डेनिस इस्टोमीन याच्याकडून हरला. 117व्या स्थानावरील इस्टोमीनविरुद्धचा पराभव धक्कादायक ठरला. त्यानंतर बेल्जियमचा डेव्हिड गॉफीन याच्याकडून तो मॉंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरला.