अलेक्‍झांडरविरुद्ध क्रोएशियाचा बॉर्ना सरस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कॅनडाच्या शापोवालोवची त्सोंगावर मात; वॉझ्नीयाकीची हार

न्यूयॉर्क - नव्या पिढीतील टेनिसपटूंच्या लढतीत क्रोएशियाच्या बॉर्ना कॉरीचने संभाव्य विजेत्यांमध्ये गणना झालेल्या जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेवला हरविले. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या कॅनडाच्या डेनिस शापोवालोव यानेही सनसनाटी निकाल नोंदविताना फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाला हरविले. महिला एकेरीत डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझ्नीयाकीने निराशा केली.

कॅनडाच्या शापोवालोवची त्सोंगावर मात; वॉझ्नीयाकीची हार

न्यूयॉर्क - नव्या पिढीतील टेनिसपटूंच्या लढतीत क्रोएशियाच्या बॉर्ना कॉरीचने संभाव्य विजेत्यांमध्ये गणना झालेल्या जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेवला हरविले. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या कॅनडाच्या डेनिस शापोवालोव यानेही सनसनाटी निकाल नोंदविताना फ्रान्सच्या ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाला हरविले. महिला एकेरीत डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझ्नीयाकीने निराशा केली.

चौथ्या मानांकित अलेक्‍झांडरचा ६१ व्या क्रमांकावरील बॉर्नाविरुद्धचा पराभव सर्वाधिक खळबळजनक ठरला. तो ३-६, ७-५, ७-६ (७-१), ७-६ (७-४) असा हरला. ब्रिटनच्या अँडी मरे याने माघार घेतल्यामुळे ड्रॉच्या खालच्या भागातून आगेकूच करण्याची सर्वोत्तम संधी अलेक्‍झांडरला होती. ‘हे निराशाजनक आहे. आजचा दिवस निराशाजनक आहे. मी ज्या पद्धतीने खेळलो ते निराशाजनक आहे. आतापर्यंतची स्पर्धा निराशाजनक ठरली,’ असे त्याने हताशपणे सांगितले. अलेक्‍झांडरने विंबल्डनची चौथी फेरी गाठून ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याने यंदा पाच एटीपी विजेतिपदे मिळविली होती. वॉशिंग्टन आणि माँट्रिएल या स्पर्धा त्याने पाठोपाठ जिंकल्या. माँट्रिएलमध्ये त्याने अंतिम फेरीत रॉजर फेडररला हरविले होते. झ्वेरेवने २२ ‘एस’ आणि ४३ ‘वीनर्स’ मारले, पण त्याचे सोपे फटके ५८ वेळा चुकले. या ‘अनफोर्स्ड एरर्स’च त्याला भोवल्या.

शापोवालोव सरस
डावखुऱ्या शापोवालोवने आठव्या मानांकित त्सोंगाला ६-४, ६-४, ७-६ (७-३) असे हरविले. शापोवालोव १८ वर्षांचा आहे. २००७च्या अमेरिकन ओपनमध्ये अमेरिकेच्या डोनाल्ड यंग, तर २०११च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमीच यांच्यानंतर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत तिसरी फेरी गाठणारा तो सर्वांत तरुण स्पर्धक ठरला. शापोवालोवने वेगवान खेळ केला. त्यामुळे त्सोंगावर सतत दडपण होते. तिसऱ्या सेटमध्ये त्याने ब्रेक मिळविला, पण टायब्रेक गमावला. तो दोन तास १२ मिनिटांत हरला.

‘टॉप टेन’मधील चौथी गारद
महिला एकेरीत आणखी एक प्रमुख खेळाडूला निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. दोन वेळा अंतिम फेरी गाठलेल्या वॉझ्नीयाकीला ४०व्या क्रमांकावरील रशियाच्या एकातेरीना माकारोवाने ६-२, ६-७ (५-७), ६-१ असे हरविले. वॉझ्नीयाकीला पाचवे मानांकन होते. ‘टॉप टेन’मधील हरलेली ती चौथी खेळाडू ठरली. द्वितीय मानांकित सिमोना हालेप, सहावी मानांकित अँजेलिक केर्बर आणि सातवी मानांकित योहाना काँटा यापूर्वी हरल्या. दुसऱ्या सेटमध्ये माकारोवाने सुरवातीलाच ब्रेक मिळविला होता, पण नवव्या गेममध्ये सर्व्हिस राखण्याची गरज असताना ती ढेपाळली. मग तिने टायब्रेकही गमावला. बरोबरी साधल्यानंतर वॉझ्नीयाकी  दर्जानुसार खेळ करण्याची अपेक्षा होती, पण माकारोवाने सलग पाच गेम जिंकले. त्यामुळे वॉझ्नीयाकीच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या. डावखुऱ्या माकारोवाविरुद्ध आधीचे सर्व सात सामने जिंकल्यानंतर वॉझ्नीयाकी प्रथमच हरली.

जायबंदी किर्गीऑस पराभूत
चौदावा मानांकित ऑस्ट्रेलियाचा नीक किर्गीऑस याला देशबांधव जॉन मीलमन याने ६-३, १-६, ६-४, ६-१ असे हरविले. मीलमन २३५व्या क्रमांकावर आहे. किर्गीऑसला उजव्या खांद्याच्या दुखापतीने त्रस्त केले होते. खेळावरील निष्ठेअभावी त्याने सामन्यानंतर स्वतःलाच दोष दिला. त्याच्यासाठी यंदाच्या प्रमुख स्पर्धा निराशाजनक ठरल्या. ७ऑस्ट्रेलियन तसेच फ्रेंच स्पर्धेत तो दुसऱ्या फेरीत हरला. विंबल्डनमध्ये त्याला पहिल्याच फेरीत कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.

माझा पुन्हा दरारा - शारापोवा
द्वितीय मानांकित सिमोना हालेपला हरवून सनसनाटी सलामी दिलेल्या मारिया शारापोवाने तिसरी फेरी गाठल्यानंतर जोरदार वक्तव्य केले. ‘मी प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा दरारा निर्माण केला आहे, तसेच चाहत्यांच्या मनातील प्रेम जागृत केले आहे. माझा पहिल्या फेरीतील खेळ पाहता याविषयी कोणता प्रश्‍न असेल असे वाटत नाही,’ असे वक्तव्य तिने केले. स्पर्धेतील तुझे स्थान समर्थनीय ठरते का, या प्रश्‍नावर तिने हे उत्तर दिले. खेळाडूंकडून आदर मिळत असल्याचे तिने नमूद केले. पत्रकार परिषदेत तिच्यावर ड्रग-टेस्टविषयी प्रश्‍नांची सरबत्ती सुरूच राहिली. यंदा तुझी चाचणी किती वेळा झाली आहे, या प्रश्‍नावर ती उसळून म्हणाली की, ‘वर्ष संपल्यानंतर आयटीएफ (आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना) याविषयीची आकडेवारी सहसा जाहीर करते.’ शारापोवाने हंगेरीच्या टिमीया बॅबोसला ६-७ (४-७), ६-४, ६-१ असे हरविले.