मरेची गाडी लेंडलने रुळावर आणली 

सुनंदन लेले
मंगळवार, 20 जून 2017

"लाल मातीच्या कोर्टवर माझा खेळ एकदम चांगला होत नाही. त्यातून मी जेव्हा फ्रेंच ओपन अगोदरच्या स्पर्धेत सपाटून मार खाल्ला तेव्हा दचकायला झाले. मी माझे माजी विश्‍वासू प्रशिक्षक इव्हान लेंडल यांना फोन केला जेव्हा ते अमेरिकेत फ्लोरीडाला होते. 

उन्हाळ्याच्या दिवसात लंडनला येण्याची मजा और असते. एका वेळी अनेक खेळांची इथे रेलचेल असते. लंडनला खेळात रस असलेले स्थानिक मित्र असले तर ते तुम्हांला यो1/2य जागी नेतात आणि मग क्रिकेट सोडून इतर खेळांची मजा लुटते येते. महान खेळाडूंना बघायची काही क्षण का होईना ऐकायची संधी मिळते. अशी संधी मित्रामुळे मिळाली जेव्हा प्रायोजकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सध्याचा अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू अँण्डी मरेला प्रत्यक्ष बघायची, ऐकायची संधी लाभली. कार्यक्रमात मरेने गेल्या काही महिन्यात त्याच्या खेळात घसरण कशी झाली आणि त्याच्या प्रशिक्षकाने त्याला त्या भुयारातून बाहेर कसे काढले हे सांगितले. 

""लाल मातीच्या कोर्टवर माझा खेळ एकदम चांगला होत नाही. त्यातून मी जेव्हा फ्रेंच ओपन अगोदरच्या स्पर्धेत सपाटून मार खाल्ला तेव्हा दचकायला झाले. मी माझे माजी विश्‍वासू प्रशिक्षक इव्हान लेंडल यांना फोन केला जेव्हा ते अमेरिकेत फ्लोरीडाला होते. 

मनासारखे खेळता येत नाहीये...तुमच्या मदतीची गरज आहे. बस इतकेच बोललो मी. इव्हान लेंडल आले आणि त्यांनी मला खेळताना बघितले तेव्हा ते चकित झाले आणि म्हणाले, " अरे बापरे...मला कल्पना नव्हती की सध्या तुझ्या खेळात इतक्‍या चुकांनी घर केले आहे'', अँण्डी मरे गालातल्या गालात हसत सांगत होता. ""सुधारणा करायला आम्ही टेनिस कोर्टवर उतरलो. लेंडल यांनी माझ्याकडून टेनिस फटक्‍यांचे साधे सरळ नेहमीचे ड्रील्स करून घ्यायला सुरुवात केली. एक एक फटका त्याच एकाग्रतेने वारंवार मारत राहणे हे कधीकधी थकवणारे आणि कंटाळवाणेही असते, पण दुसरा पर्याय नव्हता.

लेंडल यांनी माझ्या अंगात आणि मनात असलेली मरगळ झटकून टाकायला उपाययोजना केल्या. त्याचा लक्षणीय परिणाम फ्रेंच ओपन स्पर्धेत झाला. माझ्या विरुद्ध खेळताना एक गुण घ्यायलाही प्रतिस्पर्ध्याला कमालीचे कष्ट करायला लावायचे इतकेच माझे ध्येय होते. मग सुधारणा व्हायला लागली. मी उपांत्य फेरी गाठली जिथे 5 सेट पयरत सामना रंगला. आता विम्बल्डन स्पर्धे अगोदर अजून मेहनत करून ताज्या मनाने आणि नव्या उत्साहाने मला कोर्टवर उतरायचे आहे'', अँण्डी मरेने सांगितले. 

लंडनला 3 जुलैपासून विम्बल्डन स्पर्धा रंग भरणार आहेत. रॉजर फेडररने विम्बल्डन स्पर्धेत चांगले खेळता यावे म्हणून फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती. नोवाक जोकोविच सध्या टॉप फॉर्ममधे नाहीये. वावरींका आणि नदालचा खेळ हिरवळीच्या कोर्टवर अपेक्षेइतका बहरत नाही. या सगळ्याचा विचार करता अँण्डी मरे परत एकदा विम्बल्डन स्पर्धा जिंकून ब्रिटिश लोकांचे स्वप्न पूर्ण करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.