कॅनडाला रोखण्याचा बोपण्णाला विश्‍वास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

आम्हाला सांघिक खेळ करावा लागेल. क्रमवारीनुसार समीकरण कसेही असेल. आम्हाला संधीचा फायदा घ्यावा लागेल. मायदेशात खेळताना फार दडपण येते. डेव्हिस करंडक खेळणे फार वेगळे असते. तुम्ही किती सामने खेळला आहात आणि तुमचा क्रमांक किती आहे याला महत्त्व नसते. तुम्ही कोर्टवर उतरता तेव्हा सर्वस्वी वेगळी भावना असते.

- बोपण्णा

एडमंटन - डेव्हिस करंडक जागतिक गट पात्रता फेरीत कॅनडाला रोखण्याचा आत्मविश्‍वास भारताच्या रोहन बोपण्णाने व्यक्त केला. कॅनडाकडे डेनिस शापोवालोव याच्यासारखा तरुण तडफदार खेळाडू असला तरी त्याला कोर्ट गाजविण्यापासून रोखणे शक्‍य असल्याचे त्याला वाटते. ही लढत येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे.

शापोवालोव याला माँट्रिएल मास्टर्स तसेच अमेरिकन ओपनमध्ये वाइल्ड कार्ड मिळाले. याचा फायदा घेत त्याने प्रभावी कामगिरी केली. १८ वर्षांचा हा खेळाडू जागतिक क्रमवारीत ६९व्या स्थानावर आहे. युवा पिढीतील सर्वोत्तम टेनिसपटूंमध्ये त्याची गणना होते. त्याच्याशिवाय कॅनडाच्या संघात वाचेक पोस्पीसील, दुहेरीतील अनुभवी डॅनीएल नेस्टर याशिवाय पदार्पण करणारा ब्रायडन श्‍नूर असे खेळाडू आहेत.

कॅनडा घरच्या कोर्टवर खेळेल. त्यामुळे कागदावर त्यांचे पारडे आणखी जड आहे. या पार्श्‍वभूमीवर बोपण्णा म्हणाला की, डेनिस अत्यंत चांगल्या दर्जाचा खेळ करीत आहे. माँट्रिएल आणि अमेरिकन स्पर्धेत मी त्याचा खेळ पाहिला. त्याने उत्तम खेळ केला. आमच्यासमोर खडतर आव्हान असेल.

भारतीय संघात एकेरीत रामकुमार रामनाथन हा प्रमुख खेळाडू असेल. तो १५४व्या क्रमांकावर आहे. शापोवालोव याच्यापेक्षा तो ८६ क्रमांक खाली आहे. युकी भांब्री १५७व्या स्थानावर आहे. 

साकेत मायनेनीचा एकेरीत ६६५वा क्रमांक आहे. तो दुहेरीत बोपण्णासह खेळणार आहे. दुहेरीत बोपण्णावर मदार असेल. तो १७व्या क्रमांकावर आहे. महेश भूपती कर्णधार आहे.