सर्वोत्तम कामगिरीसाठी सर्वस्व पणाला लावावे लागते

सर्वोत्तम कामगिरीसाठी सर्वस्व पणाला लावावे लागते

यंदाचे वर्ष टेनिसपटू रॅफेल नदालसाठी एक यशस्वी वर्ष ठरत आहे. जागतिक क्रमवारीत तो पुन्हा अव्वल स्थानावर आला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीतील प्रवेश, फ्रेंच आणि अमेरिकन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद अशी ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे त्याने यंदा मिळविली. आता कारकिर्दीत प्रथमच तो लिव्हर कपच्या निमित्ताने टीम युरोपमधून तो प्रथमच रॉजर फेडररच्या साथीत खेळत आहे. या पार्श्वभूमीवर रॅफेल नदालशी साधलेला संवाद

या नव्या स्पर्धेविषयी तुझ्या काय भावना आहेत  ?
स्पर्धा नक्कीच मोठी आहे. टेनिसमधील सर्व दिग्गज यात सहभागी होत आहेत. यात रॉजर फेडररसारख्या महान खेळाडूबरोबर एका संघातून खेळण्याचा अनुभव नक्कीच वेगळा आणि विशेष आहे.

टेनिसमध्ये भविष्यात अशा ‘वीक एंड’ स्पर्धांची गरज आहे असे वाटते का ?
अशा स्पर्धा हा एक भाग झाला. ही स्पर्धा सर्वोत्तम आहे यात शंकाच नाही. पण म्हणून ही स्पर्धा टेनिसमधील अन्य महत्त्वांच्या स्पर्धांची जागा घेईल, असे नाही. कारकिर्दीत माझी एखादी लढत एक तासात संपलीयं असे माझ्या आठवणीतही नाही. काही सामने असे आहेत की जे आजही आठवणीत राहिले आहेत आणि टेनिसच्या इतिहासात अशा नाट्यपूर्ण लढती नक्कीच भावनात्मक ठरतात, शारीरिक क्षमतेचा कस लागतो. सर्वोत्तम खेळ दाखवण्यासाठी तुम्हाला सर्वस्व पणाला लावावे लागते. केवळ खेळाडूच नाही, तर असंख्य चाहत्यांच्या आठवणी यात गुंतलेल्या असतात.

फेडरर आणि तुझ्यातील लढत नेहमीच रंगतदार ठरते. आता त्याच्यासह एकाच संघातून खेळताना तुझ्या भावना काय आहेत ?
फेडरर आणि मी एकाच संघातून खेळतोयं, यावर मुळात विश्‍वासच बसत नाहीयं. खोलवर सर्व्हिस, ताकदवान फोरहॅंड, व्हॉलीज आणि फटक्‍यातील नजाकत असे सर्व गुण एकत्र असलेला फेडररसारखा दुसरा खेळाडू कधीच पाहिला नाही. तो एक महान आणि आव्हानात्मक प्रतिस्पर्धी आहे. आमच्यातील पारंपरिक स्पर्धा ही केवळ टेनिस विश्‍वापुरती मर्यादित नाही, तर त्याही पलीकडे गेली आहे.

कारकिर्दीत तू कोणत्या प्रतिस्पर्ध्याकडे सर्वाधिक आव्हानात्मक म्हणून बघतोस ?
सर्वोत्तम स्थानावर असताना मला रॉजर फेडररला आव्हान द्यायला नेहमीच आवडते. त्याच्या विरुद्ध आणि आता त्याच्यासह खेळायला मिळाले याचा मला अभिमान वाटतो. फेडररखेरीज नोव्हाक जोकोविच, अँडी मरे हे आव्हानात्मक आहेत. अन्यही काही प्रतिस्पर्धी आहेत; पण मला खासकरून या तिघांविरुद्ध खेळायला आवडते.

भारतात केव्हा खेळायला येणार ?
माहीत नाही. माझी संस्था भारतातील अनंतपूर एज्युकेशन केंद्राला सतत मदत करत असते. हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. हे केंद्र क्रमिक अभ्यासाबरोबर टेनिसच्या प्रशिक्षणाचेही काम करते.

टेनिसपटू म्हणून कारकीर्द संपल्यावर तुझे आयुष्य कसे असेल ?
मला लहान मुले खूपच आवडतात. मुलांवर आणि कुटुंबीयांवर प्रेम करणे हा माझ्या स्वभाव आहे. जेव्हा टेनिसपटू म्हणून निवृत्त होईन तेव्हा सर्व प्रथम मी सर्वाधिक वेळ कुटुंबीयांबरोबरच घालवेन. मुलांकडे लक्ष द्यायला मला आवडेल. (पीएमजी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com