चॅलेंजर, डेव्हिस करंडकामुळे सरशी

चॅलेंजर, डेव्हिस करंडकामुळे सरशी

म्हाळुंगे-बालेवाडीतील हार्ड कोर्टचे ऑस्ट्रेलियन ओपनशी साधर्म्य

पुणे - एटीपी चॅलेंजर स्पर्धेचे सलग तीन वर्षे आयोजन केल्यानंतर डेव्हिस करंडकाचे यजमानपद भूषविल्यामुळे देशातील प्रमुख ‘टेनिस सेंटर’ असा पुण्याचा लौकिक पुन्हा निर्माण झाला. ‘टूर’चे पदाधिकारी आणि मुख्य म्हणजे खेळाडूंच्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे एटीपी टूरवरील स्पर्धेचे यजमानपद पटकावण्यात ‘एमएसएलटीए’ने बाजी मारली. पुण्यातील हार्डकोर्ट ऑस्ट्रेलियन ओपन या मोसमातील ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या ठिकाणाशी साधर्म्य दर्शविणारी आहेत. हे ‘महाराष्ट्र ओपन’चे बलस्थान ठरेल.

एटीपी स्पर्धेच्या यजमानपदाचे ‘स्कूप’ नव्हे, तर ही स्पर्धा भारतातच राखता आली याचा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सरचिटणीस सुंदर अय्यर यांनी आवर्जून उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, ‘चेन्नईतील स्पर्धेमुळे भारतात कार्लोस मोया, रॅफेल नदाल, स्टॅन वॉव्रींका, असे मातब्बर खेळाडू येऊन खेळले. लिअँडर पेस-महेश भूपती यांची यशोमालिका येथूनच सुरू झाली. या स्पर्धेमुळे पहिल्या फळीतील खेळाडूंना किती फायदा झाला हे आपण २१ वर्षे पाहिले. दरम्यानच्या काळात आम्ही किशोर पाटील यांच्या सहकार्यामुळे एटीपी चॅलेंजर स्पर्धा घेऊन प्रमुख तसेच दुसऱ्या फळीतील खेळाडूंना व्यासपीठ देऊ शकलो. आता एटीपी स्पर्धेच्या आयोजनाची भारतातील परंपरा कायम ठेवू शकलो याचा जास्त आनंद आहे.’

‘एमएसएलटीए’ने गेली काही वर्षे सातत्याने मानांकन, आयटीएफ, आशियाई वयोगट अशा स्पर्धांसह ज्यूनियर टेनिस लीगचेही आयोजन केले. देशातील सर्वाधिक सक्रिय संघटना असा लौकिक त्यामुळेच मिळाला. याविषयी अय्यर यांनी सांगितले की, ‘पीएमडीटीए’मधील कार्यकर्त्यांमुळे डेव्हिस करंडक पुण्यात पुन्हा घेण्याचे स्वप्न साकार झाले. त्यानंतर पाच वर्षांचा करार हा ‘एमएसएलटीए’साठी मानबिंदू ठरला आहे.

संयुक्त स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले की, ‘आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेनिसचे संयोजन करण्यासाठी म्हाळुंगे-बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील सुविधा देशात सर्वोत्तम आहेत. यामुळे आम्ही एटीपी संयोजनाची धुरा यशस्वीपणे पेलू याची खात्री आहे.’

जास्त बक्षिसाची रक्कम
महाराष्ट्र ओपनची बक्षीस रक्कम पाच लाख ५० हजार डॉलर असेल. चेन्नई ओपनपेक्षा ती ४४२७० डॉलरने जास्त आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com