‘लेव्हर करंडक’ स्पर्धा ही संकल्पनाच भन्नाट

‘लेव्हर करंडक’ स्पर्धा ही संकल्पनाच भन्नाट

यंदाच्या मोसमात वयाच्या ३६व्या वर्षीदेखील सहजतेने खेळणाऱ्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरल्यानंतरही त्याला अजूनही अधिक ग्रॅंड स्लॅम जिंकण्याचा विश्‍वास आहे. टेनिसच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या ‘लेव्हर करंडक’ स्पर्धेविषयी रॉजर फेडररने व्यक्त केलेल्या भावना...

या वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेकडे बघताना तुझ्या काय भावना आहेत?
मी कमालीचा उत्सुक आहे. गेली तीन वर्षे मी या स्पर्धेविषयी ऐकत होतो, बोलत होतो. टेनिसमध्ये युरोप वि. उर्वरित जगातील खेळाडू ही संकल्पनाच भन्नाट आहे. बियाँ बोर्ग आणि जॉन मॅकेन्‍रो यांच्यासह खेळायला मिळण्याचा आनंद मिळणार तो वेगळाच आहे. पुढील काही वर्षे ही स्पर्धा नक्कीच विशेष राहणार.

रॉड लेव्हर यांच्याविषयी तुझे काय विचार आहेत? काही विशेष आठवणी आहेत का?
माझ्यासाठी रॉड लेव्हर हे सर्वकालीन महान खेळाडू आहेत. काही वर्षे मला त्यांच्यासोबत घालवायला मिळाली यासाठी मी स्वतःला नशीबवान मानतो. त्यांच्या कालावधीतील टेनिसविषयी त्यांची मते ऐकताना भान हरपून जाते. मी जर त्यांच्याविरुद्ध खेळलो असतो, तर जिंकण्यासाठी नक्कीच सर्व्ह आणि व्हॉलीचा खेळ केला असता.

या स्पर्धेत नदालसह तू एकाच संघात खेळतोय काय विचार आहेत तुझे?
राफाने टेनिसमध्ये चेंडू स्पिन करण्याची कला आणली. जी त्यापूर्वी कधी नव्हती. टेनिससाठी त्याचे योगदान मोठे आहे. त्याच्या विरुद्ध खेळलोय, पण त्याच्यासह खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा अनुभवच अविश्‍वसनीय आहे. त्याचबरोबर त्याच्या ताकदवान फोरहॅंडचा सामना करावा लागणार नाही याचे समाधानही आहे. त्याच्यासोबत दुहेरी खेळण्यासाठी आणि एकेरीत त्याला बाहेरून प्रोत्साहन देण्यासाठी मी कमालीचा आतुर आहे.

दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी या लढतीचे कर्णधार आहेत. त्यांच्यातील स्पर्धेचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल का?
या दोन महान खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळण्यास कुणासही आवडेल. ते या खेळातील महान खेळाडू आहेत. त्यांच्याबरोबर वेळ घालवायला मिळणे हादेखील टेनिसपटूंसाठी अभिमानाची बाब आहे. बोर्ग आणि मॅकेन्‍रो दोघेही एकमेकांवर विजय मिळविण्यासाठी आतुर असतात. आता कर्णधार म्हणूनही ते असणार यात शंका नाही. ते चांगले मित्रही आहेत.

या स्पर्धेसाठी गुणवान युवा खेळाडूंची निवड झाली आहे. यातील कोण खेळाडू भविष्यात तुमच्यासारखी कामगिरी करू शकतील?
अनेक गुणवान युवा खेळाडू टेनिसमध्ये आहे. पण, भविष्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषवेल असा ॲलेक्‍झांडर झ्वेरेव आमच्या संघात आहे. प्रत्येक स्पर्धेत तो आपला खेळ उंचावत आहेत आणि एक पायरी वरची चढत आहे. त्याचा भविष्यकाळ निश्‍चित उज्ज्वल आहे. अर्थात, त्याने तंदुरुस्ती आणि सातत्य राखायला हवे. ते सर्वांत महत्त्वाचे आहे.

टेनिसमध्ये सर्व काही मिळाल्यावर आता तुझे पुढील उद्दिष्ट काय?
यंदाच्या उर्वरित मोसमात मी आता ‘लेव्हर करंडक’ खेळणार आहे. त्यानंतर शांघाय, बासेल, पॅरिस, लंडन (एटीपी फायनल) या स्पर्धेत खेळणार आहे. यापेक्षा वेगळ्या स्पर्धा मी खेळणार नाही. जोपर्यंत शरीर साथ देणार तोपर्यंत मी खेळत राहणार आहे. आयुष्यात जेवढे टेनिस खेळता येईल तेवढे खेळणार आहे. अर्थात, ते तंदुरुस्ती आणि पत्नीवर अवलंबून असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com