फ्रान्सिसने झ्वेरेवला चकविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मॅसन, ओहायो - जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेव याची सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील वाटचाल दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आली. अमेरिकेच्या फ्रान्सिस टीयाफो याने त्याला तीन सेटमध्ये चकविले. फ्रान्सिसने ४-६, ६-३, ६-४ असा विजय मिळविला.

मॅसन, ओहायो - जर्मनीच्या अलेक्‍झांडर झ्वेरेव याची सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील वाटचाल दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आली. अमेरिकेच्या फ्रान्सिस टीयाफो याने त्याला तीन सेटमध्ये चकविले. फ्रान्सिसने ४-६, ६-३, ६-४ असा विजय मिळविला.

अलेक्‍झांडरने गेल्याच आठवड्यात रॉजर फेडररला हरवून कॅनडातील स्पर्धा जिंकली होती. हा पराभव त्याच्यासाठी धक्कादायक ठरला. तो म्हणाला की, ‘गेले दोन दिवस माझे चित्त थाऱ्यावर नव्हते. मी दुसऱ्या सेटमध्ये सामना गुंडाळू शकलो असतो, पण मी अपयशी ठरलो.’ १९ वर्षांच्या फ्रान्सिसने कारकिर्दीत प्रथमच ‘टॉप टेन’मधील प्रतिस्पर्ध्याला हरविले. त्याला यंदा विंबल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुसऱ्याच फेरीत अलेक्‍झांडरने हरविले होते. तो म्हणाला, ‘‘अखेरीस मी अलेक्‍झांडरला हरवू शकलो याचा आनंद आहे. पुढील दहा-१५ वर्षे आम्ही एकमेकांविरुद्ध बऱ्याच वेळा खेळू.

त्याच्याविरुद्ध मला सलग तीन वेळा हरायचे नव्हते.’’ फ्रान्सिसने दुसऱ्या सेटमध्ये तीन वेळा अलेक्‍झांडरची सर्व्हिस भेदली. निर्णायक सेटच्या दहाव्या गेममध्ये त्याने दोन ब्रेकपॉइंट आणि मॅचपॉइंट मिळविले. अलेक्‍झांडरचा फोरहॅंड बाहेर जाताच फ्रान्सिसने जिगरबाज जल्लोष केला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झालेल्या स्पेनच्या रॅफेल नदाल याने आगेकूच केली. त्याने फ्रान्सच्या रिचर्ड गास्के याचे आव्हान ६-३, ६-४ असे परतावून लावले.

महिला एकेरीत व्हीनस विल्यम्स आणि अँजेलिक केर्बर यांचे आव्हान संपुष्टात आले. रशियाच्या एकातेरीना माकारोवाने अँजेलिकला ६-४, १-६, ७-६ (१३-११) असे हरविले. आठव्या मॅचपॉइंटवर माकारोवाने विजय साकार केला. ऑस्ट्रेलियाच्या ॲश्‍लेग बार्टीने व्हीनसवर ६-३, २-६, ६-२ अशी मात केली. ॲश्‍लेग ४८व्या स्थानावर आहे.