जोकोविचची झुंज; नदालचा सुपरफास्ट विजय

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जून 2017

निकोलोझ चेंडू वेगाने मारतो. दीर्घकाळातील हा माझा सर्वोत्तम विजय आहे. आगेकूच करणे नेहमीच महत्त्वाचे असते. जेव्हा खेळताना असे सकारात्मक वाटते तेव्हा ते आणखी बहुमोल ठरते. 
- नदाल

पॅरिस : गतविजेत्या नोव्हाक जोकोविचला फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्त्झमन याने पाच सेटमध्ये झुंजविले. 55 वेळा सोपे फटके चुकल्यानंतरही; तसेच पंचांबरोबरील वादानंतरही आव्हान कायम राखण्यात जोकोविच सुदैवी ठरला. 

जोकोविचने 5-7, 6-3, 3-6, 6-1, 6-1 असा विजय मिळविला. चौथ्या सेटमध्ये 4-0 अशा आघाडीस जोकोविचला पंचांनी संथ खेळ आणि अखिलाडूवृत्ती या दोन कारणांसाठी ताकीद दिली. त्यामुळे जोकोविचचा वाद झाला. यातून त्याने लगेच सावरले. 

स्पेनच्या रॅफेल नदाल याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारताना सुपरफास्ट विजय नोंदविला. त्याने निकोलोझ बॅसिलॅश्‍विली याचा 6-0, 6-1, 6-0 असा खुर्दा उडविला. 

जागतिक क्रमवारीत निकोलोझ 63व्या स्थानावर आहे. तो दीड तासात एकच गेम जिंकू शकला. नदालने पहिला सेट 23 मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही त्याने सलग पाच गेम जिंकले होते. त्यानंतर अखेर निकोलोझने खाते उघडले. मग पुन्हा नदालचा धडाका सुरू झाला. तेव्हा वादळी पावसाची शक्‍यता निर्माण झाली होती, पण नदालने सामना फारसा लांबू दिला नाही. 

निकोलोझने पहिल्या दोन फेऱ्यांत गिल्लेस सायमन, व्हिक्‍टर ट्रॉयकी अशा खडतर प्रतिस्पर्ध्यांना हरविले होते. त्यातच नदाल पूर्वी त्याच्याविरुद्ध कधी खेळला नव्हता. नदालसमोर आता देशबांधव रॉबर्टो बॉटिस्टा आगुटचे आव्हान असेल.