नदालची आगेकूच; फेडररचा संघर्ष

पीटीआय
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

न्यूयॉर्क - रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल या प्रमुख स्पर्धकांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. नदालने तीन सेटमध्ये झटपट विजय मिळविला; पण फेडररला पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला.

न्यूयॉर्क - रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल या प्रमुख स्पर्धकांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. नदालने तीन सेटमध्ये झटपट विजय मिळविला; पण फेडररला पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला.

नदालने सर्बियाच्या ड्युसान लाजोविचला ७-६ (८-६), ६-२, ६-२ असे पराभूत केले. मुसळधार पावसामुळे हा सामना आर्थर ॲश स्टेडियमचे छप्पर बंद करून खेळविण्यात आला. ८५व्या क्रमांकावरील ड्युसानला पहिला सेट जिंकण्यासाठी केवळ सर्व्हिस राखण्याची गरज होती, पण नदालने ‘लव्ह’ने ब्रेक मिळविला. त्यामुळे टायब्रेक झाला. तो जिंकल्यानंतर नदालने पकड भक्कम केली. नदाल म्हणाला, ‘पहिल्या फेरीचा सामना कधीच सोपा नसतो. इतक्‍या भव्य ठिकाणी खेळताना तुमच्यावर थोडे दडपण असते.’ ड्युसानने विंबल्डनच्या दुसऱ्या फेरीत फेडररची सर्व्हिस भेदली होती, पण पहिला सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर त्याने तो गमावला होता. नंतर तो हरला होता. या वेळीही असेच घडले.

फेडररने अमेरिकेच्या फ्रान्सिस टीयाफो याचे आव्हान ४-६, ६-२, ६-१, १-६, ६-४ असे परतावून लावले. फ्रान्सिसने पहिल्याच  गेममध्ये फेडररची सर्व्हिस भेदली. तो फार जिद्दीने खेळतो. हा सेट त्याने जिंकला. फेडररने दुसऱ्या सेटमध्ये ब्रेकसह ३-१ अशी आघाडी घेतली. मग त्याने दहा पैकी नऊ  गेम जिंकले. चौथ्या सेटमध्ये मात्र  फेडररचा खेळ ढेपाळला. त्याने २३ मिनिटांत एकाच गेमच्या मोबदल्यात हा सेट गमावला. त्या वेळी त्याच्या बॅकहॅंडचे फटके नीट बसत नव्हते. निर्णायक सेटमध्ये मात्र फेडररने दर्जा पणास लावला. नंतर फेडररने फ्रान्सिसचे कौतुक केले. फ्रान्सिस चांगली कारकीर्द घडवू शकेल, असे फेडरर म्हणाला.

अँजेलिकला नाओमीचा धक्का 
जपानच्या नाओमी ओसाकाने गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला एकतर्फी लढतीत ६-३, ६-१ असा पराभवाचा धक्का दिला. १९ वर्षांची नाओमी जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानावर आहे. तिच्याकडे जपानी व अमेरिकी असे दुहेरी नागरिकत्व आहे. ती ‘लाँग आयलंड’मध्ये लहानाची मोठी झाली. तिने येथे अनेक वेळा सराव केला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या मॅडीसन किजविरुद्ध तिसऱ्या फेरीत ५-१ अशा आघाडीनंतर ती पराभूत झाली होती. या वेळी सरस प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय संपादन केला. नाओमी म्हणाली, ‘मी जेव्हा कोर्टवर पाऊल टाकले तेव्हा ते किती भव्य आहे हे माझ्या लक्षात आले, पण अशा ठिकाणी प्रमुख प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपण खेळू शकतो याची मला कल्पना होती. त्यामुळे मी जिंकू शकले.’

इतर प्रमुख निकाल (पहिली फेरी)
महिला एकेरी ः कॅरोलिना प्लिस्कोवा (चेक १) विवि मॅग्डा लिनेट्टी (पोलंड) ६-२, ६-१. जेलेना ओस्टापेन्को (लॅट्‌विया १२) विवि लॉरा ॲरुबार्रेना (स्पेन) ६-२, १-६, ६-१. मॅडीसन किज (अमेरिका १५) विवि एलिस मेर्टेन्स (बेल्जियम) ६-३, ७-६ (८-६). बार्बरा स्ट्रीकोवा (चेक २३) विवि मिसाकी डोई (जपान) ६-१, ६-३.