युकीची विजयी सलामी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

शेनझेन (चीन) - भारताच्या युकी भांब्रीने एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने इटलीच्या स्टीफानो नॅपोलिटॅनो याच्यावर 7-5, 6-2 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत युकी 341 व्या, तर स्टीफानो 175 व्या स्थानावर आहे. युकीसमोर आता सर्बियाच्या निकोला मिलोजेविच (क्रमांक 194) याचे आव्हान असेल. युकीने सातव्या गेममध्ये ब्रेक मिळविला होता; पण पुढील गेममध्ये त्याने सर्व्हिस गमावली. दहाव्या गेममध्ये त्याने दोन सेटपॉइंट वाचविले. त्यानंतर त्याने अकराव्या गेममध्ये ब्रेक मिळवला. पुढील गेममध्ये सर्व्हिस राखत त्याने आघाडी नक्की केली. दुसऱ्या सेटमध्ये त्याने सुरवातीलाच ब्रेक मिळवत पकड भक्कम केली. मग त्याने आणखी एका ब्रेकसह सामना जिंकला.