अन्याय झाल्यानंतर खेळाडूंचे गैरवर्तन 

नरेश शेळके - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नागपूर - भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या 51व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत वरिष्ठ गटात महाराष्ट्राच्या स्वाती गाढवे हिने आपले वर्चस्व सिद्ध केले. पण, तिच्या यशाला महाराष्ट्राच्या कुमार खेळाडूंवर झालेल्या अन्यायाचा आणि त्यानंतर त्याच खेळाडूंनी केलेल्या गैरवर्तनाचा काळा डाग लागला. 

नागपूर - भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या 51व्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत वरिष्ठ गटात महाराष्ट्राच्या स्वाती गाढवे हिने आपले वर्चस्व सिद्ध केले. पण, तिच्या यशाला महाराष्ट्राच्या कुमार खेळाडूंवर झालेल्या अन्यायाचा आणि त्यानंतर त्याच खेळाडूंनी केलेल्या गैरवर्तनाचा काळा डाग लागला. 

भिलाई येथे रविवारी (ता. 15) ही शर्यत पार पडली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील सर्व खेळाडूंच्या प्रवेशिका महाराष्ट्र राज्य ऍथलेटिक्‍स संघटनेने भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाकडे पाठविल्या होत्या. सर्वच खेळाडूंच्या जन्मतारखांच्या दाखल्यांची तपासणी एकदिवस आधी पूर्ण झाली होती. तपासणी झालेल्या सर्वांना त्यांचे "चेस्ट नंबर' देण्यात आले होते. महाराष्ट्राच्या 20 वर्षांखालील मुले आणि मुलींच्या 20 तसेच 18 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंचे "चेस्ट नंबर' राखून ठेवण्यात आले होते. चौकशी केल्यावर एकाही खेळाडूने जन्मतारखेचा उल्लेख केला नसल्याचे कारण देण्यात आले. जन्मतारीख देण्याबाबत महाराष्ट्राला पुन्हा एकदा 14 तारखेला कळविल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. 

स्पर्धेच्या वेळेपर्यंत मुलांना चेस्ट नंबर मिळाले नसल्याचे निदर्शनास आल्यावर प्रशिक्षक रवींद्र टोंग यांनी प्रवेशिकांची छाननी करणाऱ्या व्यक्तीस याचे कारण विचारले. वेळ जाऊ लागल्यावर विनवणीही केली. मात्र, वरून आदेश असल्यामुळे नंबर रोखण्यात आल्याचे कारण देण्यात आले. ऍथलेटिक्‍स महासंघाचे सचिव सी. के. वॉल्सन यांनीदेखील तीच भूमिका घेताना महाराष्ट्राच्या कुमार खेळाडूंना प्रवेश नाकारला. 

वचपा काढला 
कुमार खेळाडूंना प्रवेश नाकारण्यामागे ऍथलेटिक्‍स महासंघातील राजकारण असल्याची चर्चा स्पर्धा स्थळी सुरू होती. गेल्यावर्षी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रेल्वेची खेळाडू बदलून देण्याची मागणी उच्च अधिकाऱ्याचा फोन येऊनही डावलण्यात आली होती. त्याचाच वचपा अशा पद्धतीने काढल्याचे येथे दबक्‍या आवाजात बोलले जात होते. 

तरीही खेळाडू धावले 
महाराष्ट्राच्या कुमार धावपटूंसमोर शर्यत बघण्यापलीकडे काहीच उरले नव्हते. प्रत्यक्षात शर्यत सुरू झाल्यावर महाराष्ट्राचे चार धावपटू "चेस्ट नंबर' न लावताच सहभागी झाल्याचे आढळून आले. प्रशिक्षकांनी प्रकरण चिघळू नये म्हणून शर्यतीचे सहा किलो मीटर अंतर संपल्यावर तीन धावपटूंना बाहेर काढले. चौथा धावपटू आघाडीवर असल्याने त्याला बाहेर काढणे कठिण होते. तोवर हा घोळ पंचांपर्यंत पोचला होता. अखेरीस शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात या खेळाडूलाही प्रशिक्षकांनी बाहेर काढले. त्याच क्षणी आयोजन समितीच्या सदस्याने त्या खेळाडूस पकडले. त्याला अधिकाऱ्यांकडे घेऊन जात असताना त्या खेळाडूने हिसका देऊन पळ काढला. त्यामुळे गोंधळात भर पडली होती. स्पर्धा सुरू असताना प्रारंभ रेषेवर एकही धावपटू नसल्याचा दावा पंचांनी केला, तर महाराष्ट्र प्रशिक्षकांनी धावपटू धावणार असल्याची आम्हाला कल्पना नव्हती असे सांगितले.

Web Title: 51 th National cross country championships