महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेवर अजित पवारांची फेरनिवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

'एमओए'च्या कार्यकारिणीत बदल व्हावा अशी इच्छा होती. परंतु, कोणी विरोध दर्शवीत नव्हते. मात्र, सरचिटणीसपदासाठी अर्ज भरुन मी विरोध दर्शविला. संघटनेला तरुण आणि कार्यक्षम अध्यक्ष लाभले आहेत. परंतु, संघटनेची घटना जवळपास 30 वर्षे जुनी आहे. त्यामध्ये काळानुरूप बदल केला जावा, यांसारख्या माझ्या काही सूचना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मान्य केल्या. त्यामुळे, निवडणुकीमधून माघार घेतली.
- नामदेव शिरगावकर, मॉडर्न पेंटॅथलॉन

पिंपरी : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या (एमओए) निवडणुकीचा फार्स या वेळी देखील कायम राहिला. अजित पवार, बाळासाहेब लांडगे, धनंजय भोसले यांची अनुक्रमे अध्यक्ष, सरचिटणीस आणि खजिनदार या प्रमुख पदांवर फेरनिवड करण्यात आली. चार उपाध्यक्ष आणि पाच कार्यकारिणी सदस्यांची देखील फेरनिवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमधील चार नवे चेहरे हेच काय ते या निवडणुकीचे वेगळेपण ठरले. या सर्व निवडी बिनविरोध झाल्या.

कार्यकारिणीच्या चार नव्या चेहऱ्यांमध्ये व्हॉलिबॉल संघटनेकडून जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेमध्ये शिरकाव केला. त्यांची निवड लक्षवेधक आणि चर्चेचा विषय ठरली. अशोक दुधारे (तलवारबाजी), चंद्रजित जाधव (खो-खो), झुबिन अमारिया (जलतरण) हे अन्य तीन नवे चेहरे 'एमओए'च्या पटलावर आले.

'एमओए'ची वार्षिक सर्वसाधारण सभा 25 मार्च रोजी होणार आहे. त्याच दिवशी निवडणूक देखील घेण्यात येणार होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आणि माघार घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. ही सर्व प्रक्रिया पिंपरी येथील मगर स्टेडियमच्या आवारातील महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या कार्यालयात पार पडली. निवृत्त प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश बी. डी. कदम यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. संघटनेतच नसल्यामुळे किशोर वैद्य, मोहन भावसार आणि वली महंमद 'एमओए'मधून बाहेर पडले. 'एमओए'च्या सर्वसाधारण सभेत या कार्यकारिणीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल. सभनंतरच पत्रकार परिषदेत आम्ही आमची भूमिका मांडू, असे बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.

कार्यकारिणी : अध्यक्ष : अजित पवार (खो-खो), उपाध्यक्ष : प्रल्हाद सांवत (ऍथलेटिक्‍स), अशोक पंडित (नेमबाजी), प्रदीप गंधे (बॅडमिंटन), जय कवळी (बॉक्‍सिंग), सरचिटणीस : बाळासाहेब लांडगे (कुस्ती), सह-सचिव : प्रकाश तुळपुळे (टेबल टेनिस), मगेश लोहार (वेटलिफ्टिंग), खजिनदार : धनंजय भोसले (ज्युडो), सदस्य : दयानंद अमीन (ट्रायथलॉन), प्रशांत देशपांडे (तिरंदाजी), मुजताबा लोखंडवाला (रोइंग), सुंदर अय्यर (टेनिस), विजय संतान (व्हॉलिबॉल), चंद्रजित जाधव (खो-खो), अशोक दुधारे (तलवारबाजी).

कशी घडली निवडणूक प्रक्रिया

  • अध्यक्षासह एकूण 17 जागांसाठी निवडणूक
  • सरचिटणीसपदाखेरीज अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव, खजिनदारपदासाठी प्रत्येकी एक अर्ज
  • सरचिटणीसपदासाठी बाळासाहेब लांडगे यांना मॉडर्न पेंटॅथलॉनच्या नामदेव शिरगावकरांचे आव्हान
  • माघारीच्या मुदतीत शिरगावकरांची माघार
  • कार्यकारिणीच्या आठ जागांसाठी दहा अर्ज
  • कार्यकारिणीसाठी फुटबॉल संघटनेच्या किरण चौगुलेंचा अर्ज बाद
  • मॉडर्न पेंटॅथलॉनच्या विपीन सुर्यवंशी यांची माघार. त्यामुळे कार्यकारिणी सदस्यांची निवडही बिनविरोध

'एमओए'च्या कार्यकारिणीत बदल व्हावा अशी इच्छा होती. परंतु, कोणी विरोध दर्शवीत नव्हते. मात्र, सरचिटणीसपदासाठी अर्ज भरुन मी विरोध दर्शविला. संघटनेला तरुण आणि कार्यक्षम अध्यक्ष लाभले आहेत. परंतु, संघटनेची घटना जवळपास 30 वर्षे जुनी आहे. त्यामध्ये काळानुरूप बदल केला जावा, यांसारख्या माझ्या काही सूचना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मान्य केल्या. त्यामुळे, निवडणुकीमधून माघार घेतली.
- नामदेव शिरगावकर, मॉडर्न पेंटॅथलॉन

Web Title: ajit pawar reelected as president of maharashtra olympic association