तिरंदाजी संघटना निवडणूक लांबणीवर?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - भारतीय तिरंदाजी संघटनेची निवडणूक 31 मार्चपूर्वी होण्याची शक्‍यता दुरावली आहे. केंद्रीय क्रीडा खात्याची मान्यता नसल्याने आशिया कप तिरंदाजी स्पर्धेस मदत मिळाली नव्हती. तेव्हा ही प्रक्रिया या महिनाअखेरपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते; पण सध्या तरी ही शक्‍यता कमी दिसत आहे. संघटनेतील घटनाबदलाची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. केंद्र सरकारच्या क्रीडा संघटना नियमावलीनुसार ही घटना तयार करण्यात येणार आहे. या घटनेस मंजुरी मिळाल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया पार पडेल. या संदर्भात उद्या (ता. 15) खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोणत्याही क्रीडा संघटनेच्या निवडणुकीस किमान पंधरा दिवसांची नोटीस देणे भाग असते. भारतीय तिरंदाजी संघटनेच्या निवडणुकीसाठी यापूर्वी दीड महिना आधी नोटीस दिली जात होती. घटना बदलानंतर निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकीची तारीख निश्‍चित करतील; मात्र निवडणूक 31 मार्चपूर्वी होण्याची शक्‍यता कमीच असल्याचे संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनीही मान्य केले.