Asia Cup 2018 : हाँगकाँगने फोडला भारताला घाम

Shikhar Dhawan
Shikhar Dhawan

दुबई : शिखर धवनच्या शतकाच्या पाठबळावर आशिया कप स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात खेळताना भारतीय फलंदाजांनी 50 षटकात 7 बाद 285 धावा उभारल्या. हॉंगकॉंग संघाकरता हे मोठे आव्हान वाटत होते. हॉंगकॉंगच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांचा सहजी सामना करत 174 धावांची भागीदारी उभारली तेव्हा रोहित शर्माच्या पायाखालची वाळू सरकली होती. सलामीच्या जोडी फुटल्यावर वाढत जाणारी धावगती राखणे हॉंगकॉंगच्या अन्य फलंदाजांना जमले नाही. हॉंगकॉंगचा डाव 8 बाद 259 वर रोखला गेला. भारताने सामना 26 धावांनी जिंकला तरी कौतुकाचा मान लढत देणाऱ्या हॉंगकॉंग संघाला मिळाला. 

भारतासमोर सामना खेळताना कर्णधार अंशुमन रथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेऊन जणू विळीवर पाय ठेवला. कप्तान रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर शिखर धवन आणि रायुडुने मोठी भागीदारी रचली. इंग्लंडमधे साफ अपयशी ठरलेल्या शिखर धवनने दुबळ्या हॉंगकॉंगसमोर मान खाली घालून फलंदाजी करताना फॉर्म परत मिळवला. 14वे एक दिवसीय शतक ठोकताना शिखरने फक्त 105 चेंडू घेतले. 

भारतीय संघात पुनरागमन करताना अंबाती रायुडुने विश्वासाने फलंदाजी करून अर्धशतक ठोकले. धोनी शून्यावर बाद झाल्यावर प्रेक्षक नाराज झाले. दिनेश कार्तिक षटकार मारायच्या प्रयत्नात बाद झाला तो बाबरने घेतलेला झेल प्रेक्षणीय होता. 50 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 7 बाद 285चा धावफलक उभारला होता. 
अपेक्षेपेक्षा हॉंगकॉंग संघाच्या सलामीच्या जोडीने फारच मस्त फलंदाजी केली. निझाकत खानचे अर्धशतक आणि त्याने कप्तान अंशुमन रथ सोबत केलेली 174 धावांच्या भागीदारीने भारतीय संघाच्या तोंडचे पाणी पळाले होते. 36 डिग्री गरम हवेने नाही तर हॉंगकॉंगच्या सलामीच्या जोडीने केलेल्या फलंदाजीने भारतीय खेळाडूंना घाम फुटला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा :
Asia Cup 2018 : हाँगकाँगने पळवले भारताच्या तोंडचे पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com