Asian games 2018 : भारतीय पुरुषांची जोरदार सुरवात

Sayli-Gokhale
Sayli-Gokhale

आशियाई क्रीडा स्पर्धेत सध्याचा भारतीय बॅडमिंटन संघ आत्तापर्यंतचा देशाचा सर्वांत ताकदवान संघ म्हणता येईल. भारतास ब्राँझच्या फेऱ्यातून बाहेर काढण्याची या संघाची नक्कीच ताकद आहे. भारतीयांनी वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली, भारतीयांतच अंतिम लढत झाली, तर तो नक्कीच सुखद धक्का असेल, पण याची अपेक्षा बाळगणे नक्कीच गैर नाही. भारतीयांची कामगिरी हेच सांगत आहे.

किदांबी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साई प्रणीतचा भारतीय संघ ताकदवान आहे, याची प्रचिती पहिल्याच दिवशी आली. त्यांनी अपेक्षेनुसार एकही गेम न गमावता मालदीववरील विजयाची औपचारिकता पूर्ण केली.  

श्रीकांतने १८ मिनिटांत लढत जिंकली, तर प्रणॉयने २१ मिनिटांत आणि प्रणीतने २४ मिनिटांत त्यावरून त्यांचा धडाका लक्षात येतो. श्रीकांतने एकंदरीत नऊ गुणच गमावले, तर प्रणॉयने १४ आणि प्रणीतने १५. त्यावरून त्यांची एकतर्फी हुकमत लक्षात येते. एकंदरीत नक्कीच सुरुवात चांगली झाली आहे. या विजयाने आगामी इंडोनेशियाविरुद्धच्या खडतर लढतीची पूर्वतयारी भारतीयांनी नक्कीच केली असेल. इंडोनेशिया दुहेरीत खूपच ताकदवान आहेत. त्यांची जोडी जागतिक क्रमवारीत अव्वल आणि नववी आहे. त्यामुळे आपल्याला विजयासाठी एकेरीतील यशावरच जास्त अवलंबून राहावे लागेल. दुहेरीतील आव्हान आवाक्‍याबाहेरच नसेल, तर अवघड नक्कीच आहे. श्रीकांत, प्रणॉय, प्रणीतने एकेरीत विजय मिळविला, तर दुहेरीचा कसही लागणार नाही. 

भारतीय महिलांनी गतस्पर्धेत सांघिक ब्राँझ जिंकले होते, पण साईना, सिंधूचा मुकाबला उबेर कप विजेत्या जपानविरुद्ध आहे. यामागुची आणि ओकुहारा ही नावे आता भारतीय बॅडमिंटन रसिकांनाही चांगलीच माहिती आहेत. सिंधू, साईनाची सातत्याने त्यांच्याविरुद्ध लढत होत असते. साईना, सिंधूची कामगिरी पाहता त्यांच्याकडून विजयाची नक्कीच आशा असेल, पण भारतासाठी हे पुरेसे नसेल. एकेरीतील तिसरी लढत आणि दुहेरीवर खूप काही अवलंबून असेल. त्यांचा चांगलाच कस पणास लागणार आहे. जागतिक महिला दुहेरी क्रमवारीत जपानच्या दोन जोड्या अव्वल आहेत. एकंदरीत भारतीयांचा आज सोमवारी कस लागणार आहे. पुरुष संघास विजयाची जास्त संधी आहे, पण खेळात काहीही घडू शकते. अश्विनीचा अनुभव, तिची जिद्दही प्रभावी ठरू शकेल. खडतर आव्हानच खेळ उंचावत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com