‘मिस्टर कूल’ श्रीकांत ‘नंबर वन’

kidambi-srikanth
kidambi-srikanth

मुंबई - पुल्लेला गोपीचंद यांचे ऑल इंग्लंड विजेतेपद पाहून स्पर्धात्मक बॅडमिंटनकडे वळलेल्या किदांबी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे. संगणकांच्या आधारे जागतिक क्रमवारी निश्‍चित होण्यास सुरवात झाल्यावर अव्वल स्थान पटकावलेला श्रीकांत हा पहिला भारतीय पुरुष खेळाडू आहे.

तीन वर्षांपूर्वी साईना नेहवालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय होती. १९८० मध्ये प्रकाश पदुकोण अव्वल होते, पण त्या वेळी या क्रमवारीस अधिकृत मान्यता नव्हती. श्रीकांतने आता ७६ हजार ८९५ गुणांसह अव्वल क्रमांक मिळविताना जागतिक विजेत्या व्हिक्‍टर ॲक्‍सेलसेन (७७ हजार १३०) यास मागे टाकले आहे. 

मिस्टर बॅडमिंटन कूल, असेच श्रीकांतचे चाहते त्याला म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीत शांत राहून यश मिळविण्यात तो वाक्‌बगार समजला जातो. हे त्याने वारंवार घडवले आहे. त्यासाठी तो धोनी आणि रॉजर फेडरर यांना आपला आदर्श मानतो.  

जागतिक क्रमवारीत अव्वल झाल्यामुळे मी नक्कीच खूष आहे. प्रकाश सरांनंतर ही कामगिरी करणारा मी पहिला भारतीय ठरलो आहे. गोपी सर, माझे कुटुंबीय, पुरस्कर्ते, गोस्पोर्टस्‌ फाउंडेशन, सपोर्ट स्टाफ, मार्गदर्शकांमुळे हे साध्य झाले. अर्थातच मी यावर समाधानी नाही. टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाची शान उंचावण्याचे माझे लक्ष आहे, असे श्रीकांतने सांगितले.  खरं तर श्रीकांतला गतवर्षीच अव्वल होण्याची संधी होती. त्याने इंडोनेशियन, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रान्स सुपर सिरीज स्पर्धा जिंकल्या होत्या, पण दुखापतीमुळे तो वर्षाअखेरीस असलेल्या स्पर्धांत खेळू शकला नाही. त्यामुळे त्याचे जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान दुरावले होते. 

मला अजून खूप गोष्टींवर मेहनत घ्यायची आहे. माझी कायम गोपीचंद सर आणि प्रकाश पदुकोण सरांबरोबर तुलना होते. मी त्यांच्या तुलनेत कुठेच नाही. ऑल इंग्लंड, जागतिक स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिंपिक जिंकले तरच ते महत्त्वाचे असेल. तेच तर माझे लक्ष्य आहे. 
- किदांबी श्रीकांत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com