बॅडमिंटनपटू लुवांगला ब्रॉंझपदक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

नवी दिल्ली - मणिपूरचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू मैस्नाम मेईराबा लुवांग याने थायलंडमधील योनेक्‍स शेरा रोझा बीटीवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉंझ पदक मिळविले.

नवी दिल्ली - मणिपूरचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू मैस्नाम मेईराबा लुवांग याने थायलंडमधील योनेक्‍स शेरा रोझा बीटीवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉंझ पदक मिळविले.

खुल्या विभागातील पुरुष एकेरीमध्ये उपांत्य फेरीत लुवांगला थायलंडचा अव्वल खेळाडू पी. थोंगनुआम याच्याकडून पराभूत व्हावे लागले.
लुवांग प्रकाश पदुकोण ऍकॅडमीत प्रशिक्षण घेतो. त्याच्या यशामुळे मणिपूरमधील क्रीडा गुणवत्ता केवळ बॉक्‍सिंग आणि फुटबॉलपुरतीच मर्यादित नसल्याचे दिसून आले आहे. तो 13 वर्षांचा आहे. बॅडमिंटन प्रशिक्षक असलेल्या वडिलांमुळे त्याला खेळात रस निर्माण झाला. तीन वर्षांचा असल्यापासून तो बॅडमिंटन खेळू लागला.

त्याने राज्य आणि राष्ट्रीय 10 व 13 वर्षांखालील गटात लक्षवेधी कामगिरी केली. गुलबर्ग्यातील अखिल भारतीय किशोर स्पर्धेत त्याने सातवे मानांकन असतानाही विजेतेपद मिळविले. 2014 मध्ये त्याने डेन्मार्कमधील "ऍरॉस कप' जिंकला होता. आता त्याने या गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर रूपांतर केले आहे.

लुवांग याला "ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट'चा पाठिंबा लाभला आहे. त्याला 2013 मध्ये "ओजीक्‍यू'ने शिष्यवृत्तीसाठी निवडले. सुरवातीला त्याला दर महिन्याला दहा हजार रुपये भत्ता मिळत होता. तो पश्‍चिम इम्फाळ जिल्ह्यातील सेगा रोड ख्वाऐपाकपाम लेईकराई या गावचा रहिवासी आहे.

"ओजीक्‍यू'चे "सीईओ' वीरेन रस्किना यांनी सांगितले की, लक्ष्य सेन आणि लुवांग यांची आम्ही निवड केली. आम्ही 2020 आणि 2024 ऑलिंपिकसाठी दीर्घकालीन योजना आखली आहे. या दोन्ही मुलांची वाटचाल योग्य मार्गावर सुरू आहे. प्रकाश पदुकोण आणि विमल कुमार अशा दिग्गजांचे मार्गदर्शन लाभणे हे दोघांचे सुदैव आहे.'