बीसीसीआयकडून आयसीसीची कोंडी करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

नेहरा की शमी हा कळीचा मुद्दा 
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील चौथ्या मध्यमगती गोलंदाजाच्या जागेसाठी आशीष नेहरा आणि महम्मद शमी यांच्यात चुरस आहे. अर्थात ही संघनिवड कधी होईल, याबाबत काहीच सांगितले जात नाही. 

मुंबई / नवी दिल्ली - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड लांबवत भारतीय क्रिकेट मंडळ आयसीसीवर दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

आयसीसीमधील भारताचा उत्पन्नाचा वाटा कमी करण्याबाबतच्या निर्णयावर आयसीसी सोमवारी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्याची दाट शक्‍यता आहे. ते टाळण्यासाठी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा बहिष्काराचा विचार कायम आहे, हेच भारतीय मंडळ सूचित करीत आहे. 

चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जूनमध्ये आहे. या स्पर्धेसाठी संघ निवडीची मुदत 25 एप्रिल आहे. आयसीसीची बैठक 24 एप्रिलला आहे. बैठकीपूर्वी संघ जाहीर न करून आयसीसीवर दडपण आणण्याचा भारतीय मंडळाचा थेट प्रयत्न आहे. आयसीसीच्या उत्पन्नात योग्य वाटा न मिळाल्यास चॅम्पियन्स करंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा भारतीय मंडळ विचार करीत आहे. 

आधुनिक क्रिकेटमध्ये संघनिवडीची अंतिम मुदत असा काही प्रकार नसतो. चॅम्पियन्स स्पर्धा अजून खूप दूर आहे, असे भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासकीय समितीचा बहिष्कारास विरोध असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही याबाबत एकमत झाले नाही. त्यामुळेच याबाबतचे सर्वाधिकार आयसीसीच्या सभेस उपस्थित राहणाऱ्या अमिताभ चौधरी यांना देण्याचा निर्णय झालेला नाही. भारतीय मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसारच मी कार्यवाही करणार आहे. सध्या एवढेच सांगणे योग्य होईल, असे चौधरी यांनी सांगितले. 

संघनिवड लांबवण्याचा निर्णय भारतीय मंडळाने आयसीसीला कळवलेला नाही. आवश्‍यकताच असेल, तर ही औपचारिकता पार पाडण्यात येईल. आता स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय झाला, तर काय होईल. भारतीय मंडळाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी संघ निवडला आहे; पण तो खेळणारच याची हमी नाही, असे निवडलेल्या संघाबाबत कळवताना आयसीसीला सांगायचे. आयसीसीच्या बैठकीत काय होते, यावर सर्व काही अवलंबून असेल, असे भारतीय मंडळाच्या क्रिकेट पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
आयसीसीला भारताकडून सर्वाधिक उत्पन्न मिळते; मात्र नव्या निर्णयानुसार भारतास 53 कोटी अमेरिकन डॉलरच आठ वर्षांसाठी मिळतील. आता यात वाढ न झाल्यास आयसीसीच्या बैठकीनंतर बीसीसीआयची पुन्हा बैठक होईल व त्यात चॅम्पियन्स स्पर्धेचा निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. 

नेहरा की शमी हा कळीचा मुद्दा 
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघातील चौथ्या मध्यमगती गोलंदाजाच्या जागेसाठी आशीष नेहरा आणि महम्मद शमी यांच्यात चुरस आहे. अर्थात ही संघनिवड कधी होईल, याबाबत काहीच सांगितले जात नाही. 

रविचंद्रन अश्विन येत्या आठवड्यात सराव सुरू करेल. त्याच्यासह रवींद्र जडेजाची निवड निश्‍चित आहे. अखेरच्या षटकात प्रभावी मारा करू शकणारा जसप्रीत बुमराह, स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार, उमेश यादव यांची निवड निश्‍चित आहे. हार्दिक पंड्या बॉलिंग ऑल राऊंडर म्हणून संघात येईल. या परिस्थितीत शमी आणि नेहरा यांच्यातच चुरस असेल. यात नेहराचे पारडे जड आहे. 

शमी कसोटीसाठी जास्त उपयुक्त मानला जातो. तो 2015 च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर एकदिवसीय लढत खेळलेला नाही. त्याची दिल्ली डेअरडेव्हिल्स सर्व लढतींसाठी निवडही करीत नाही. नेहरा 2011 च्या वर्ल्डकपनंतर एकदिवसीय संघातून बाहेर आहे; पण ट्‌वेंटी 20 लढतीसाठी त्याला पसंती दिली जात आहे. कर्णधार विराट कोहलीसही गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी तो हवा आहे. काही दिवसांपूर्वी त्याला दुखापतीने सतावले होते; पण तो लवकरच तंदुरुस्त होईल. आयपीएल स्पर्धेत प्रभावी यॉर्कर टाकत असलेल्या बसिल थम्पी याचाही विचार होऊ शकेल, असेही मानले जात आहे.