अतिरिक्त 10 कोटी डॉलरचा प्रस्ताव अजूनही कायम 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

तुम्ही जर 40 कोटी 50 लाख डॉलर देणार असाल, तर मी बीसीसीआयमधील माझ्या सहकाऱ्यांना तयार करू शकेन, असे बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या अमिताभ चौधरी यांनी शशांक मनोहर यांना सांगितले; परंतु मनोहर यांनी ही मागणी धुडकावल्याचे समजते.

नवी दिल्ली - चॅंपियन्स करंडक स्पर्धेतील भारताच्या सहभागावर अनिश्‍चिततेचे ढग घट्ट झालेले असताना आयसीसीने महसूल हिश्‍श्‍यातील रकमेत दिलेला अतिरिक्त 10 कोटी डॉलरचा प्रस्ताव अजून कायम ठेवला आहे. नव्या रचनेला मान्यता देताना हा प्रस्ताव आयसीसीने मागे घेतलेला नाही, असे आयसीसीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

नव्या रचनेनुसार बीसीसीआयला 29 कोटी 30 लाख डॉलर मिळणार आहेत. यामध्ये आणखी 10 कोटी डॉलरची वाढ करण्याची तयारी आयसीसीने दाखवली आहे. हा प्रस्ताव मी बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत ठेवणार आहे आणि त्यामध्ये होणारा निर्णय आयसीसीला कळवू, असे मी आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांना कळवले असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

हे अतिरिक्त 10 कोटी डॉलर स्वीकार केले, तर बीसीसीआयला जवळपास 39 कोटी डॉलर मिळतील, परंतु दुबईतील बैठकीसाठी गेलेले बीसीसीआयचे इतर पदाधिकारी 40 कोटी 50 लाख डॉलरची मागणी करत आहे, तसेच कोणताही घटनात्मक बदल करायचा नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. 

तुम्ही जर 40 कोटी 50 लाख डॉलर देणार असाल, तर मी बीसीसीआयमधील माझ्या सहकाऱ्यांना तयार करू शकेन, असे बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या अमिताभ चौधरी यांनी शशांक मनोहर यांना सांगितले; परंतु मनोहर यांनी ही मागणी धुडकावल्याचे समजते. दरम्यान, चॅंपियन्स स्पर्धेतून माघार हा आमच्यासमोर पर्याय आहे, असे चौधरी यांनी सांगितल्याची चर्चा आहे.