बीसीसीआयची "विराटभक्ती' मोदीभक्तांनाही लाजवणारी: रामचंद्र गुहा

वृत्तसंस्था
रविवार, 21 जानेवारी 2018

अजिंक्‍य रहाणे दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळला असता, भुवनेश्‍वर कुमार याला सेंच्युरियन येथील सामन्यात वगळले नसते; आणि भारतीय संघ श्रीलंकेबरोबर भारतात गल्ली क्रिकेट न खेळता दक्षिण आफ्रिकेत दोन आठवडे आधीच गेला असता, तर या मालिकेचा निकाल कदाचित वेगळा लागला असता

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यासमोर अक्षरश: गुडघे टेकल्याने भारतास दक्षिण आफ्रिकेमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागत असल्याचे परखड टीकास्त्र बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे माजी सदस्य व प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांनी सोडले आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या मंत्रिमंडळाकडून केली जाते; त्यापेक्षाही जास्त भक्ती बीसीसीआयकडून कोहलीची केली जाते. कोहलीच्या अधिकारापलीकडील क्षेत्रांमध्येही त्याने व्यक्त केलेल्या मतापुढे मंडळाकडून मान तुकविली जाते. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी कोहलीचा उल्लेख करताना कायम विराट असाच केला आहे. थेट विराट अशा नामोल्लेखामधून जवळिक दाखविण्याचा कदाचित बीसीसीआयचा उद्देश असेल. मात्र वर्तणूक शास्त्राच्या दृष्टिकोनामधून पाहिले असता ही जवळिक मालक व नोकर अशा नात्याची असल्याचे आढळते. भ्रष्टाचार व वशिलेबाजी या भारतीय क्रिकेटला जडलेल्या दोन जुन्या व्याधी आहेत. यामध्येच आता "सुपरस्टार सिंड्रोम' या नव्या व्याधीची भर पडली आहे. कोहली हा उत्तम खेळाडू आहे, उत्तम नेताही आहे. मात्र त्याच्या नेतृत्वावर व्यवस्थात्मक नियंत्रण (इन्स्टिट्यूशनल चेक्‍स अँड बॅलन्स) राहिले नाही; त्याची व त्याच्या चाहत्यांचीही इच्छा असलेले यश (ग्रेटनेस) तो कधीच मिळवू शकणार नाही,'' अशी टीका गुहा यांनी एका दैनिकात लिहिलेल्या स्तंभामधून केली आहे.

याबरोबरच गुहा यांनी याआधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची हकालपट्टी व इतर संवेदनशील मुद्यांवरही परखड मत व्यक्त केले.

विराटहट्टापायीच कुंबळेची हकालपट्टी...
एक क्रिकेटपटू व व्यक्तिमत्त्व म्हणून कोहलीने गाठलेली उंची व दर्जा याची केवळ माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्याशीच तुलना होऊ शकत होती. यामुळेच कोहलीचा कुंबळेशी खटका उडाला. कुंबळे याच्याऐवजी प्रशिक्षणाचा अनुभव नसलेल्या, व्यक्तिमत्त्व व क्रिकेटमधील यश या दोन्ही दृष्टिकोनांमधून अत्यंत मर्यादित यश मिळविलेल्या व्यक्तीची नेमणूक का करण्यात आली? कोहलीच्या अहंकारापुढे व्यवस्था वाकविण्याचे भय असल्यामुळेच टॉम मूडीसारख्या अनुभवी प्रशिक्षकास डावलून रवी शास्त्रीची निवड करण्यात आली. या मूढ निर्णयाचे परिणाम भारतात दुबळ्या संघांविरोधात खेळताना दिसले नाहीत. मात्र आता ते लपून राहणार नाहीत

तर कदाचित...!
दक्षिण आफ्रिकेमधील सराव सामना रद्द करण्यात आला नसता आणि भारतीय संघ निवडणारी समिती शहाणी वा धाडसी असती; तर कदाचित भारतास 0-2 असा पराभव पत्करावा लागला नसता. याचबरोबर अजिंक्‍य रहाणे दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळला असता, भुवनेश्‍वर कुमार याला सेंच्युरियन येथील सामन्यात वगळले नसते; आणि भारतीय संघ श्रीलंकेबरोबर भारतात गल्ली क्रिकेट न खेळता दक्षिण आफ्रिकेत दोन आठवडे आधीच गेला असता, तर या मालिकेचा निकाल कदाचित वेगळा लागला असता...

Web Title: BCCI Virat Kohli Indian cabinet Narendra Modi: Ramchandra Guha