युव्हेंट्‌सचे बचावाचे आक्रमण

युव्हेंट्‌सचे बचावाचे आक्रमण

बार्सिलोना - लिओनेल मेस्सी, नेमार आणि सुआरेझच्या बार्सिलोनास गोल करण्यापासून रोखण्याची कामगिरी युव्हेंट्‌सने चॅंपियन्स फुटबॉल लीगच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दोन्ही टप्प्यांच्या लढतीत केली आणि आपण विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे जणू रणशिंग फुंकले.

युव्हेंट्‌सने घरच्या मैदानावरील पहिल्या टप्प्याची लढत ३-० जिंकली होती. बार्सिलोनाच्या होम ग्राउंडवरील दुसऱ्या टप्प्याची लढत गोलशून्य बरोबरीत सोडवून उपांत्य फेरी गाठली. बार्सिलोनाने उपउपांत्यपूर्व फेरीत पहिल्या टप्प्यातील चार गोलची पिछाडी भरून काढत पॅरीस सेंट जर्मनीविरुद्ध बाजी मारली होती; पण याची पुनरावृत्ती होणार नाही, हे दाखवताना युव्हेंट्‌सने जबरदस्त बचावात्मक खेळ केला.

जागतिक फुटबॉलमधील ताकदवान बचावात्मक संघात इटलीची गणना होते. युव्हेंट्‌सने नेमके हेच दाखवून दिले. युव्हेंट्‌सने लौकिकास साजेशी व्यूहरचना करताना बचावावर भर दिला; पण त्याचवेळी बार्सिलोनावर प्रसंगी वेगवान प्रतिआक्रमण करत दडपणही ठेवले. त्यांनी आक्रमक सुरवात करत प्रथम बार्सिलोनाची जोरदार प्रतिआक्रमणाची योजनाच हाणून पाडली. पीएसजीने बार्सिलोनास पहिल्याच मिनिटात गोल करू दिला होता. युव्हेंट्‌सने हे टाळत बार्सिलोनावरील दडपण वाढवत नेले. त्यातच बार्सिलोना गोलक्षेत्राजवळ आल्यावर त्या क्षेत्रात जास्त गर्दी करण्याची योजनाही चांगलीच यशस्वी ठरली.

बार्सिलोना मैदानाच्या मध्यातून आक्रमण करत होते. त्याचवेळी युव्हेंट्‌सची प्रतिआक्रमणे दोन्ही बगलेतून होती. बार्सिलोनाचे ‘एमएनएस’ त्रिकूट एकमेकांपासून दूर राहील याची काळजी युव्हेंट्‌सने घेतली. उत्तरार्धात बार्सिलोनाने युव्हेंट्‌सची प्रतिआक्रमणे रोखली खरी; पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. गोलपोस्टजवळ भिंत करण्यात युव्हेंट्‌स यशस्वी ठरले. बार्सिलोनास त्यामुळे केवळ प्रयत्नांची शर्थ केल्याचेच समाधान लाभले.

युव्हेंट्‌स हा इटलीतील संघ आहे, त्यामुळे त्यांचा बचाव चांगला असणारच. आम्ही आमचा खेळ केला. सुरवातीस संधीही निर्माण केल्या; पण त्यांनी मोठा पर्वतच उभा केला होता. तो पार करणे जमले नाही.
- गेरार्ड पिक्वे, बार्सिलोना खेळाडू

मॅंचेस्टर युनायटेड, बायर्न म्युनिक आता युव्हेंट्‌स
दोन्ही लढतींत बार्सिलोनास गोल करण्यापासून रोखणारा संघ चॅंपियन्स लीग विजेता झाल्याचे स्पर्धेचा इतिहास सांगतो. ही कामगिरी मॅंचेस्टर युनायटेडने २००७-०८ मध्ये केली आणि ते सरस ठरले, तर हाच पराक्रम बायर्नने २०१२-१३ मध्ये केला आणि त्यांनी बाजी मारली. आता हीच कामगिरी करणारे युव्हेंट्‌स विजेते ठरणार का, याची चर्चा सुरू आहे. 

 युव्हेंट्‌स गोलरक्षक गिआनलुईगी बफॉन याच्याविरुद्ध ४६ चॅंपियन्स लीग लढतीत एकही गोल नाही.
 इकेर कॅसिलास याचा सर्वाधिक ५० सामन्यांचा विक्रम.
 बफॉन याने यंदाच्या स्पर्धेत नऊपैकी सात सामन्यांत एकही गोल स्वीकारलेला नाही.
 ताकदवान सहकाऱ्यामुळे बफॉनचा कस एकदाच लागला.
 युव्हेंट्‌सविरुद्ध या मोसमात एकंदरीत दोनच गोल.
 युव्हेंट्‌सने १९९६ नंतर चॅंपियन्स लीग जिंकलेली नाही.
 लिओनेल मेस्सीचे पाच शॉटस्‌ गोलपासून दूर, चॅंपियन्स लीग स्पर्धेत मेस्सीबाबत हे २०१५ च्या रोमाविरुद्धच्या लढतीनंतर प्रथमच घडले.
 गतवर्षीही बार्सिलोना उपांत्यपूर्व फेरीतच बाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com