"सिंह' भारताला "हाईना' बांगलादेशचा धोका!

सुनंदन लेले
बुधवार, 14 जून 2017

हाईनाच्या जबड्यात जबरदस्त ताकद असल्याने त्याचा चावा जीवघेणा असतो. म्हणून सिंह हाईनाला शत्रू मानतात. भारतीय संघ कितीही मजबूत असला तरी बांगलादेश संघाने 2007 साली मोठ्या स्पर्धेत पराभव करून जणू सिंहाचा मागून चावा घेतला आहे

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारतीय संघाची बाजू मजबूत आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. 2007 साली वर्ल्डकप स्पर्धेत झालेला पराभवाचा अपवाद सोडता भारतीय संघाने शेजारी देशाच्या क्रिकेट संघावर नेहमीच मात केली आहे. फरक इतकाच झाला आहे की गेल्या तीन वर्षांत बांगलादेश संघाने खास करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्षणीय सुधारणा करून दाखवली आहे. खालमानेने खेळणारा बांगलादेश संघ आता ताठ मानेने मोठ्या संघांना टक्कर देण्याची तयारी राखून आहे. गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाचे पारडे कागदावर स्पष्ट जड असले तरी 2007 सारखा अपघात घडवून आणायचे मनसुबे बांगलादेश संघ बाळगून आहे. भारतीय संघाला संपूर्ण क्रिकेट खेळून अपघात होऊ न देण्याची खबरदारी घ्यायची आहे.

भारता आणि बांगलादेश संघाला मोठ्या सामन्यात खेळताना बघून माझ्या डोळ्यांसमोर आफ्रिकन जंगलातील उदाहरण येते! जंगलात सिंह आणि हाईनाचे हाडवैर असते. सिंह ताकदीने हाईनापेक्षा कितीतरी ताकदवान असला तरी हाईना सिंहाला सतत त्रास देता. कधी सिंहाने केलेली शिकार पळवून नेतात तर कधी मांडीमागून सिंहाला चावतात. हाईनाच्या जबड्यात जबरदस्त ताकद असल्याने त्याचा चावा जीवघेणा असतो. म्हणून सिंह हाईनाला शत्रू मानतात. भारतीय संघ कितीही मजबूत असला तरी बांगलादेश संघाने 2007 साली मोठ्या स्पर्धेत पराभव करून जणू सिंहाचा मागून चावा घेतला आहे. भारतीय संघ तो पराभव कधीच विसरणार नाही. गुरुवारच्या सामन्यात बांगलादेश संघ त्याच प्रकारचा त्रास देऊन भारतीय संघाला हैराण करायचा प्रयत्न करणार आहे.

चालू स्पर्धेतील तीनही सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपले काम चोख पार पाडले आहे. शिखर धवनने तीनही सामन्यात समोरील गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. विराट कोहलीलाही चांगली लय सापडली आहे. गोलंदाजीत अश्‍विन संघात परतल्याने समतोल साधला गेल्यासारखे वाटत आहे. गुरुवारच्या सामन्यात विराट कोहली दक्षिण आफ्रिकेसमोर खेळलेला संघच परत मैदानात उतरवेल असे वाटते.

बांगलादेश संघाची ताकद त्यांच्या वेगवान गोलंदाजीतील विविधतेवर आणि चार चांगल्या फलंदाजांमध्ये आहे. तमीम इक्‍बाल, मुश्‍फीकूर रहीम, सकीब अल हसन आणि मेहमदुल्ला या चार फलंदाजांनी संघाला तारून नेले आहे. भारतीय गोलंदाजांना चार चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बाद करायचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान जरा अजून मोठे होते जेव्हा एजबॅस्टनची खेळपट्टी जास्त करून फलंदाजांचे लाड करते. गुरुवारच्या महत्त्वाच्या सामन्याकरता तयार केली गेलेली खेळपट्टी भरपूर रोलींग केलेली, कमी गवत असलेली असेल.

गुरुवारी भारतीय प्रेक्षक जास्त संख्येत असणार यात शंका नाही. फक्त बांगलादेशी पाठीराखे कितीही कमी संख्येत असले तरी ते भरपूर आवाज करून आपल्या संघाला प्रोत्साहन देता हे बघायला मिळाले आहे. भारत वि पाकिस्तान सामन्यात जेव्हढ्या ठिणग्या प्रेक्षकांमध्ये पडल्या नाहीत तेव्हढ्या ठिणग्या भारत बांगलादेश सामन्याला पडतील, असे अनुभवावरून वाटते.