कार्लसनच्या हत्तीला कर्जाकिनची वेसण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

दुसरा डाव बरोबरीत; कार्लसन १, कर्जाकिन १

न्यूयॉर्क - जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन याने हत्तीच्या प्रभावी चाली करत जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील दुसरा डाव लक्षणीय केला. कार्लसनच्या या चालींमुळे पांढरी मोहरे असूनही सर्गी कर्जाकिनला वर्चस्व राखता आले नाही. या लढतीत पहिल्या दोन डावांनंतर प्रतिस्पर्ध्यांचा प्रत्येकी एक गुण आहे.

पहिल्या डावाच्या तुलनेत दुसरा डाव जास्त लवकर बरोबरीत सुटला. या लढतीत ३३ चालींतच झटपट गुण वाटून घेतल्याचे नक्कीच समाधान होते. त्याचबरोबर त्याने तेराव्या चालीपासून कर्जाकिनवर दडपण आणले. कार्लसनच्या आगळ्या चालींमुळे कर्जाकिन त्रस्त झाला, हे या डावाचे वैशिष्ट्य.

रुय लोपेझ पद्धतीने झालेल्या या डावात कार्लसनच्या चाली वॅसलिन टोपालोवविरुद्धच्या जुलै महिन्यातील लढतीच्या आठवण करून देत होत्या. त्या वेळी कार्लसनने बाजी मारली होती. कार्लसनने त्यातच हत्तीची ई ८ ही चाल करत कर्जाकिनला चांगलाच धक्का दिला. त्यामुळे तेराव्या चालीपूर्वी कर्जाकिनने खूपच विचारपूर्वक प्रतिकार केला. कार्लसनने तेराव्या चालीपूर्वी २५ मिनिटे वेळ घेतला; पण त्या वेळी त्याने कर्जाकिनच्याच चालींचा जास्त अभ्यास केल्याचे जाणवले. कार्लसनचा हत्ती त्यानंतर चांगलाच सक्रिय झाला. त्यानंतरही पटावरील रिक्त घरांवर कर्जाकिनचे जास्त वर्चस्व असल्याचे दिसत होते. त्याने याचा फायदा घेण्यासाठी केलेले आक्रमणही सावधच होते. 

विसाव्या चालीपर्यंत वजीर पटावरून दूर झाल्यामुळे कार्लसन खूश होता. २५ व्या चालीपर्यंत पटाच्या मध्यभागी असलेली प्यादी काहीही करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आणि डाव बरोबरीत सुटण्याचे स्पष्ट संकेतही मिळाले. ही औपचारिकता ३३ चालींनंतर पूर्ण झाली.