‘दहा वर्षांच्या तपश्‍चर्येचे फळ’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

राहुलची कारकीर्द
२००८     -    युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण
२००९     -    कुमार आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्ण
२००९     -     कुमार जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्य
२०११     -     आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत ब्राँझ
२०११     -     राष्ट्रकुल अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्ण
२०१८     -     राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण
पाच वेळा राष्ट्रीय विजेता

पुणे - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक हे आतापर्यंत दहा वर्षे घेतलेल्या तपश्‍चर्येचे फळ असल्याचे मत कुस्तीगीर राहुल आवारे याने मंगळवारी येथे व्यक्त केले. 

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर राहुल आज पुण्यात परतला. त्या वेळी महापौर मुक्ता टिळक यांनी त्याचे पुणेरी पगडी घालून स्वागत केले. या वेळी त्याचे गुरू काका पवार, आई, वडील यांच्यासह आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील अनेक मल्ल उपस्थित होते. प्रचंड उत्साहात त्याचे स्वागत करण्यात आले. पुण्यात पाऊल ठेवल्यापासून चाहत्यांच्या गराड्यात राहिलेल्या राहुलशी संवाद साधला असता त्याने आपली कारकीर्दच उलगडून दाखवली.

किशोर, कुमार गटापासून अनेक पदके मिळविली. वरिष्ठ गटातही अनेक पदकांना गवसणी घातली. पण, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे पदक सातत्याने खुणावत होते, असे सांगून राहुल म्हणाला, ‘‘दहा वर्षे कठोर मेहनत घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावर हुलकावणी देणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सुवर्णपदकासाठी अक्षरशः झपाटून गेलो होतो. दहा वर्षे केलेल्या या अखंड तपश्‍चर्येचे फळ गोल्ड कोस्टला मिळाले. आतापर्यंतच्या कारकिर्दीमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. खूप आनंदी आहे. अर्थात, इतक्‍यावर समाधानी नाही. ऑगस्ट महिन्यातील आशियाई स्पर्धेसाठी सराव सुरू करणार आणि ऑलिंपिक पदक डोळ्यासमोर असेल.’’

आतापर्यंतचा राहुलचा प्रवास सोपा नव्हता. तो म्हणाला, ‘‘गुरू हरिश्‍चंद्र बिराजदार यांचे निधन झाले. २०१२-१३ वर्षात दुखापतीने त्रस्त होतो. शस्त्रक्रियाही करावी लागली. हा काळ कठिण होता. खेळ कायम ठेवायचा की नाही अशा द्विधा मनस्थितीत होतो. पण, काका पवारांनी सांभाळले. माझ्या सराववर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आणि आज या दोन्ही गुरुंचे स्वप्न साकार करू शकलो.’’

आई-वडिलांनी केलेले संस्कार, त्यांच्याकडूनच मिळालेले कुस्तीचे बाळकडू. त्यानंतर गुरू बिराजदारांनी पाडलेले पैलू आणि पुढे जाऊन काका पवारांनी घेतलेली काळजी यामुळेच इथपर्यंत पोचलो. त्यामुळे हे सुवर्ण त्यांच्यासाठीच.
- राहुल आवारे

Web Title: Commonwealth Games gold medal ten years Penance