राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत विक्रम कुराडेला रौप्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - सिंगापूर येथील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत येथील विक्रम कुराडेने आज ग्रीको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले. भारताच्याच रवींदरकडून त्याला अंतिम लढतीत केवळ दोन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. तत्पूर्वी झालेल्या लढतीत त्याने पाकिस्तानचा मल्ल महंमद बी याच्यावर आठ गुणांनी विजय मिळवला.

कोल्हापूर - सिंगापूर येथील राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत येथील विक्रम कुराडेने आज ग्रीको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले. भारताच्याच रवींदरकडून त्याला अंतिम लढतीत केवळ दोन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. तत्पूर्वी झालेल्या लढतीत त्याने पाकिस्तानचा मल्ल महंमद बी याच्यावर आठ गुणांनी विजय मिळवला.

दरम्यान, विक्रमच्या यशाची माहिती मिळताच त्याच्या मूळगावी नंदगाव (ता. करवीर) येथे फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा झाला.   विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात विक्रमने उत्तरप्रदेशात झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात रवींदरचा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले होते. हा विजय संपादन करताना विक्रमने राष्ट्रीय पातळीवरील रवींदरचा सलग चौदा वेळचा सुवर्णपदकाचा विक्रमही मोडीत काढला होता. 

पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल येथे वस्ताद काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम सराव करतो. तो भारतीय रेल्वेच्या सेवेत आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने त्याने गेल्या महिन्यात ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात सलग १४ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या खात्यात सुवर्णपदक आणले आणि राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राच्या खात्यावर रौप्यपदक जमा केले. विक्रमला ‘एनआयएस’ प्रशिक्षक रणधीरसिंह पोंगल, राजू कोळी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, शरद पवार, सुनील लिम्हण, संदीप रासकर यांचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह नंदगावचे माजी सरपंच शाबाजी कुराडे यांच्या प्रोत्साहनामुळे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. 

कुस्तीचं वेड
विक्रमला लहानपणापासूनच कुस्तीचे वेड. सामान्य शेतकरी कुटुंबातील विक्रमने सुरवातीला नंदगावात कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर मोतीबाग तालमीत त्याने कुस्तीतील डावांवर भर दिला. सध्या पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात तो सराव करतो. आजवर विविध राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्याने सात सुवर्ण, तीन रौप्य, पाच कास्य अशा पदकांची लयलूट केली आहे.

Web Title: commonwealth wrestling championship vikram kurade win silver medal