लढवय्या म्हणून माझी ओळख राहावी : युवराजसिंग

सुनंदन लेले
बुधवार, 14 जून 2017

चॅम्पियन्स करंडक क्रिकेट सामन्यादरम्यान गुरुवारी भारताचा उपांत्य सामना बांगलादेशविरुद्ध होत आहे. भारताचा खेळाडू युवराजसिंग याच्या कारकिर्दीतील हा तीनशेवा एकदिवसीय सामना आहे. त्यानिमित्ताने त्याने पत्रकारांशी मारलेल्या गप्पा.

प्रश्‍न : तुझी ओळख कशी राहावी असे तुला वाटते?
युवराज : लढवय्या म्हणून माझी ओळख राहवी असे मला खरच वाटते. भारतीय संघाकरता खेळणे माझे स्वप्न होते. मला अजून पहिला सामना स्पष्ट आठवतो. ऑस्ट्रेलियासमोरचा. भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केले. म्हणून मी मजल मारू शकलो. 300 वा एकदिवसीय सामना कमाल वाटते मला. इतका लांब पल्ला गाठेन कधीच वाटले नव्हते.

प्रश्‍न : पदार्पण केले तेव्हा आणि आता काय फरक आहे?
युवराज : क्रिकेटमधे फरक झालाय. खेळाडूंचा फिटनेस काहीच्या काही वाढलाय. प्रत्यक्ष खेळात टी20 क्रिकेटने बदल घडवला आहे. समाधान याच गोष्टीचे आहे की तेव्हा भारतीय संघ बलवान होता आणि आत्ताही आहे. बदल इतकाच आहे की त्या वेळी मी नवखा होतो आता बुजुर्ग झालोय.

प्रश्‍न : बरीच वादळे येऊन गेली तुझ्या जीवनात.
युवराज : होय बरीच वादळे ज्याला मी धैर्याने तोंड दिले. मला इतकेच सगळ्यांना सांगावेसे वाटते की स्वप्न बघणे सोडू नका. सत्यात यावे म्हणून कष्ट करा. सगळे काही शक्‍य आहे आपल्याला. याच कारणाने मी माझ्या सामाजिक कार्याचे नाव "यू वी कॅन' म्हणजेच तुम्ही आपण सगळे करू शकतो.

प्रश्‍न : काय संदेश देशील तरुण खेळाडूंना?
युवराज : स्वप्नांचा पाठलाग करा आणि पत्रकारांपासून लांब रहा. असे हसत हसत सांगून टोमणा मारून युवराज सिंग इतर खेळाडूंसोबत भारतीय संघात सहभागी झाला.