'महाराष्ट्र केसरी' एक अनुत्तरित प्रश्‍न

maharashtra kesari wrestling tournament
maharashtra kesari wrestling tournament

'महाराष्ट्र केसरी' बनलेला मल्ल या आखाड्यातून उतरल्यावर पुन्हा कुठेच दिसत नाही. वर्ष सरतं, नव्या अधिवेशनाचे पडघम वाजू लागतात, मग पुन्हा मल्ल शड्डू ठोकून उभे ठाकतात. हे असं किती दिवस चालणारं? "महाराष्ट्र केसरी' ठरल्यानंतर तो मल्ल जातो कुठे, हा प्रश्‍न गेली कित्येक वर्षे अनुत्तरित आहे. कुस्तीला, अस्तित्वाच्या आघाडीवर असलेली स्थिरता आखाड्याबाहेर कधी मिळणार, याचा विचार होणे आवश्‍यक आहे.

"नेमेचि येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे राज्य कुस्तीगीर परिषदेचे आणखी एक अधिवेशन अर्थात "महाराष्ट्र केसरी' किताबाची लढत गेल्याच आठवड्यात पुणे येथे झाली. जळगावच्या विजय चौधरी याने सलग तिसऱ्यांदा हा मानाचा किताब मिळविला. स्पर्धेत पहिल्या फेरीपासूनच त्याची देहबोली एखाद्या अजिंक्‍यवीराला शोभेल अशीच होती. त्याने एकही लढत कठीण केली नाही. समोर आलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला त्याने लीलया हरवले. त्याची कुस्ती आखाडाप्रेमींना भावणारी निकाली (चीतपट) नसेलही; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणांचा विचार करताना त्याचा खेळ नक्कीच इतरांपेक्षा सरस होता. त्याला पुण्याच्या 19 वर्षीय अभिजित कटके या महाविद्यालयीन युवकाने आव्हान दिले होते. अभिजित हाही प्रथमच महाराष्ट्र केसरी किताबासाठी खेळत असला तरी तयारी आणि कौशल्याच्या आघाडीवर तो कुठेही कमी नव्हता. विजयचा अनुभव आणि त्याहीपेक्षा घरच्या प्रेक्षकांसमोर किताबाची लढत खेळताना आलेले दडपण त्याच्या अपयशासाठी निर्णायक ठरले. सागर बिराजदार, विलास डोईफोडे, विक्रांत जाधव, समाधान पाटील असे अनेक मल्ल या वर्षीच्या "केसरी' किताबाच्या आखाड्यात चमकून गेले.

एक स्पर्धा झाली, विजेता ठरला इतक्‍यावरच चर्चा थांबत नाही. कुस्ती हा आपला खेळ असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण खूप मागे आहोत. यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला, तर आपण कुठेच दिसत नाही. अशा वेळी दर वर्षीचा हा "महाराष्ट्र केसरी' किताबाचा आखाडा बघितला की कशाला हा सगळा घाट? असा विचार मनात डोकावून जातो. याची दोन प्रमुख कारणे म्हणजे सरकार पातळीवर असलेली अनास्था आणि निधीअभावी मल्लाने स्वीकारलेले अन्य मार्ग. यामुळे "महाराष्ट्र केसरी' बनलेला मल्ल या आखाड्यातून उतरल्यावर पुन्हा कुठेच दिसत नाही. वर्ष सरतं, नव्या अधिवेशनाचे पडघम वाजू लागतात, मग पुन्हा मल्ल शड्डू ठोकून उभे ठाकतात. हे असं किती दिवस चालणारं? "महाराष्ट्र केसरी' ठरल्यानंतर तो मल्ल जातो कुठे, हा प्रश्‍न गेले कित्येक वर्षे अनुत्तरित आहे. कुस्तीला, अस्तित्वाच्या आघाडीवर असलेली स्थिरता आखाड्याबाहेर कधी मिळणार, याचा विचार होणे आवश्‍यक आहे.

आतापर्यंत "महाराष्ट्र केसरी' घडल्यानंतर मल्ल एक तर कुठेच दिसत नाही आणि दिसला तर तो राजकारणात गेलेला आढळतो. हे बरोबर नाही. मल्लाने मातीच्या नव्हे मॅटच्या आखाड्यावरच रंगायला हवं; पण हे चित्र दिसत नसल्याचे मान्य करायला हवे. याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा सगळी चर्चा आर्थिक पाठबळावर येऊन थांबते. काही तरी ठोस नियोजन राबवणे आवश्‍यक आहे. मल्लाला उपजीविकेसाठी वणवण फिरायला लागू नये, ही अपेक्षा बाळगली जाते. विजय दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने त्याला शासकीय सेवेत घेण्याचे आश्‍वासन दिले. या वर्षी तिसऱ्यांदा त्याने किताब मिळविल्यावर आजच (शनिवारी) हिवाळी अधिवेशनात त्यांनी विधानसभेत त्याला नोकरी देण्याची घोषणा केली. मुख्य म्हणजे त्याला शासकीय सेवेत सामावून घ्यायचे म्हणजे शासकीय अध्यादेश निघायला हवा. तोच आजपर्यंत निघालेला नाही. त्याचबरोबर राज्य अधिवेशनातील प्रत्येक वजनी गटातील पहिल्या सहा खेळाडूंना वार्षिक मानधन मिळते. हे मानधन पुरेसे नसले, तरी मल्लांसाठी ते खूप उपयोगाचे असते; पण गेली तीन वर्षे तीन महिन्यांचेच मानधन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. आर्थिक चणचण जाणवत असल्यामुळे आणि खुराकाचा खर्च भागवण्यासाठी मल्ल किताबी लढतीनंतर विविध ठिकाणी होणाऱ्या मैदानावर आणि सत्कार सोहळ्यांवर अवलंबून राहतात. ही सर्व मैदाने मातीवर होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्यांना मॅटचा अनुभव कमी मिळतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्री-स्टाईल आणि ग्रिको रोमन असे दोन प्रकार असतात. फ्री-स्टाईल प्रकारात आपली कामगिरी अलीकडे उठून दिसू लागली आहे. ग्रिको रोमन प्रकारात आपण अजूनही पहिल्याच पायरीवर आहोत, हे या वर्षीच्या कामगिरीनंतर म्हणण्यास जागा आहे. महाराष्ट्राने या प्रकारातही आपले वर्चस्व राखले आहे. काका पवार, गोविंद पवार, विक्रम कुऱ्हाडे, अनिल तोडकर, अण्या जगताप असे राज्यातील गुणी मल्ल ग्रिको रोमन प्रकारातीलच होते; पण फिरून प्रश्‍न पुन्हा आर्थिक पाठबळावर येऊन ठेपतो. तेव्हा मल्ल पुन्हा फ्री-स्टाईलकडे वळतो. सब-ज्युनियर आणि ज्युनियर गटात ग्रिको रोमन प्रकारात महाराष्ट्र पहिल्या दोनमध्ये असते; पण हा मल्ल जेव्हा वरिष्ठ गटात येतो, तेव्हा तो पैसे मिळविण्यासाठी फ्री-स्टाईलकडे वळतो. परिणामी राज्याची कुस्ती प्रगती तेथेच खुंटते. राज्य कुस्तीगीर परिषदेने यावर आळा घालण्यासाठी "महाराष्ट्र केसरी' किताबाखेरीज अन्य "केसरी' स्पर्धांवर बंदी आणली.

स्पर्धेच्या नावातील "केसरी' गेले; पण दृष्टिकोन बदललेला नाही. भरघोस रकमेच्या पारितोषिकांमुळे मल्ल अशा स्पर्धांकडे वळायचे ते वळताच. आता त्यावर दुसरा पर्याय म्हणजे अशी खुली मैदाने ही मॅटवर घेतली गेली तर त्याचा चांगला परिणाम आपल्याला मिळू शकतो; पण शासकीय मदत, कुस्तीगीर परिषदेचा पुढाकार आणि मल्लाची मेहनत हा सगळा योग जुळून यायला हवा. तरच "केसरी'नंतर पुढे काय, या अनुत्तरित प्रश्‍नाचे उत्तर सुटायला किमान सुरुवात होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com