डच स्पर्धेत जेतेपदाचा 'आनंद'! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नोव्हेंबरमध्ये स्कॉटीश ओपन खेळताना त्याची पाठ दुखावली होती. त्याला पाच महिने ब्रेक घेणे भाग पडले. त्यामुळे तो जागतिक क्रमवारीत 108 व्या स्थानी गेला. आता या विजेतेपदामुळे तो अव्वल शंभरमध्ये नक्की येईल. 
 

मुंबई - मुंबईच्या आनंद पवारने पाच महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करताना डच आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्याने निर्णायक लढतीत द्वितीय मानांकित खेळाडूस हरवले. 

वॉटरिंगेन (नेदरलॅंड्‌स) येथे झालेल्या या स्पर्धेत आनंदने निर्णायक लढतीत फिनलंडच्या कॅली कॉलीनेन याला 20-22, 21-19, 21-17 असे नमवले. कॉलीनेन सध्या जागतिक क्रमवारीत 73 वा आहे. पहिल्या गेममध्ये आनंदने गेम पॉईंट दवडला. मात्र त्याचा पुढील दोन गेममध्ये खेळावर परिणाम होऊ दिला नाही. 

निर्णायक लढतीपूर्वी आनंदने एक गेम गमावला नव्हता, तसेच त्याला त्यापूर्वी जास्तीत जास्त 40 मिनिटेच लढावे लागले होते, पण निर्णायक लढतीत त्याला 68 मिनिटे झुंज द्यावी लागली. ""विजेतेपदाचा आनंद आहेच, पण त्याचबरोबर पुन्हा कोर्टवर आलो. दीर्घ लढतींचाही त्रास झाला नाही. त्यास यशाची झळाळी लाभली, त्यामुळे खूष आहे,'' असे आनंदने सांगितले. आता तो थायलंड आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेत खेळणार आहे. त्यानंतर थायलंड ग्रां. प्रि. गोल्ड स्पर्धा त्याचे लक्ष्य आहे. 

नोव्हेंबरमध्ये स्कॉटीश ओपन खेळताना त्याची पाठ दुखावली होती. त्याला पाच महिने ब्रेक घेणे भाग पडले. त्यामुळे तो जागतिक क्रमवारीत 108 व्या स्थानी गेला. आता या विजेतेपदामुळे तो अव्वल शंभरमध्ये नक्की येईल.